दुचाकीसह चोरीचा मुद्देमाल जप्त बीड : बीड शहरातील बंद घरे हेरून घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, दोन घरफोड

दुचाकीसह चोरीचा मुद्देमाल जप्त
बीड : बीड शहरातील बंद घरे हेरून घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ जून २०२६ रोजी ही घरफोडीची घटना घडली होती. फिर्यादी आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कडी-कोयंडे तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३३१ (३) (४) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या तपासादरम्यान कलीम अलीम शेख (वय ३२, रा. दहिफळ, ता. जि. बीड) यानेच हा गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला; मात्र तो पोलिसांना मिळून येत नव्हता.
दरम्यान, १५ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कलीम शेख हा नाळवंडी नाका परिसरात कोणाची तरी वाट पाहत थांबला आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पथकाने तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीदरम्यान आरोपीने शिवाजीनगर परिसरातील घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर अधिक तपासात त्याने बीड शहरातील निहाळनगर भागातील आणखी एका बंद घरात चोरी केल्याची माहिती दिली.
पोलिसांनी अभिलेखांची पडताळणी केली असता बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२६/२०२६ अंतर्गत घरफोडीचा गुन्हा नोंद असल्याचे समोर आले. चौकशीत हा गुन्हाही कलीम शेख यानेच केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीच्या अटकेमुळे बीड शहरातील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी, रोख रक्कम आणि चोरीतील अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बांटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार राहुल शिंदे, गोविंद राख तसेच पोलीस अंमलदार अश्पाक सय्यद, मनोज परजणे आणि चालक नितीनजी वडमारे यांनी सहभाग घेतला.

COMMENTS