Homeताज्या बातम्या

ठाकरे सेनेत मोठी फूट! ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी; ६ खासदारांच्या स्वतंत्र गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

नवी दिल्ली/मुंबई : राज्यात सुरू असलेल्या 'ऑपरेशन टायगर'च्या केवळ वल्गना नव्हत्या, तर एक मजबूत रणनीती आखून ते ऑपरेशन यशस्वी करण्यात शिंदे यांच्या

अशोकरावांविरुद्ध सर्वपक्षीय मोर्चेबांधणी? नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपला रोखण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली
विधान परिषदेच्या रणांगणात ‘टोकन’ची चर्चा; 452 मतदारांभोवती फिरतेय कोट्यवधींची राजकीय गणिते!निवडणूक प्रचारापेक्षा ‘मतदार व्यवस्थापन’च अधिक चर्चेत; सहली, रिसॉर्ट्स आणि आमिषांच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले
‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेनंतर आज ठाकरेंच्या खासदारांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक

नवी दिल्ली/मुंबई : राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या केवळ वल्गना नव्हत्या, तर एक मजबूत रणनीती आखून ते ऑपरेशन यशस्वी करण्यात शिंदे यांच्या शिवसेनेला मोठे यश मिळाले आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेत उभी फूट पडली असून, नऊपैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेचे बळ पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील या सहा खासदारांनी बंडाचे निशाण फडकावत स्वतंत्र गट स्थापन केला आहे. तसे अधिकृत पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिले असून, त्यांच्या या प्रस्तावाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिल्यामुळे ठाकरे गटाचे संख्याबळ कमालीचे घटले आहे.

या मोठ्या घडामोडींनंतर ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत, लोकसभा सदस्य अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी तातडीने दिल्लीत धाव घेत लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. कोणत्याही संभाव्य गटाला मान्यता देण्यापूर्वी मूळ पक्षाची भूमिका ऐकून घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. पक्षाच्या अधिकृत भूमिकेची दखल घेतल्याशिवाय कोणताही निर्णय होऊ नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काही गंभीर आरोप केले. काही लोकप्रतिनिधींना आर्थिक आणि राजकीय प्रलोभने दाखवून पक्षापासून दूर नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला. लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारच्या घडामोडी योग्य नसल्याचे सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, तसेच पक्षाशी निष्ठावान राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. या घडामोडींमुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मोठी मालिका सुरू झाली आहे.

पक्षान्तरबंदी कायद्याचे गणित लोकसभेत ठाकरे गटाचे एकूण ९ खासदार आहेत. पक्षान्तरबंदी कायद्यानुसार, जर २/३ (दोन तृतीयांश) सदस्य मूळ पक्षापासून वेगळे झाले, तरच त्यांच्या स्वतंत्र गटाला किंवा विलीनीकरणाला कायदेशीर मान्यता मिळू शकते. ९ पैकी ६ खासदार एकत्र आल्यामुळे हा आकडा नेमका २/३ होतो. परिणामी, या बंडखोर खासदारांना कायदेशीर संरक्षण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळेच या घडामोडींना मोठे कायदेशीर आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

ठाकरे गटाकडून व्हिप जारी, आज पक्षाची बैठक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ६ खासदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून तातडीने सर्व खासदारांसाठी व्हिप (पक्षादेश) जारी करण्यात आला आहे. आज गुरुवारी होणाऱ्या संसदीय मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला सर्वांनी अनिवार्यपणे उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली. दरम्यान, ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यामुळे ठाकरे गटाचा व्हिप या खासदारांसाठी तांत्रिकदृष्ट्या बंधनकारक नसेल; मात्र पक्षाचा आदेश डावलल्यामुळे ठाकरे गट त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईची मागणी करू शकतो.

‘ऑपरेशन टायगर’ नेमके कसे राबवले? ठाकरे गटातील काही खासदारांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून कथितरित्या “ऑपरेशन टायगर” राबवले जात असल्याची चर्चा रंगली आहे. हे ऑपरेशन गुप्त ठेवण्यासाठी खासदारांनी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला. एका खासदाराने हैदराबादपर्यंत मोटारीने (कारने) प्रवास करून तेथून विमानाने दिल्ली गाठली. तर दोन खासदारांनी नांदेडहून खाजगी विमानाने दिल्लीचा प्रवास केला. याशिवाय एका खासदाराने मुंबईहून तर दुसऱ्या खासदाराने शिर्डीहून थेट विमानाने दिल्ली गाठल्याची माहिती समोर आली आहे.

COMMENTS