नागपूर : नागपूर शहरातील आराधना नगर परिसरातील एका वाहन दुरुस्ती केंद्राला (गॅरेज) बुधवारी पहाटे भीषण आग लागून चार वाहने जळून खाक झाली. या घटनेत सु

नागपूर : नागपूर शहरातील आराधना नगर परिसरातील एका वाहन दुरुस्ती केंद्राला (गॅरेज) बुधवारी पहाटे भीषण आग लागून चार वाहने जळून खाक झाली. या घटनेत सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आसपासची सुमारे ५० लाख रुपयांची मालमत्ता वाचवण्यात यश आले आहे.
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आराधना नगर येथे असलेल्या वाहन दुरुस्ती केंद्रात ही घटना घडली. केंद्राचे मालक अनंत काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सहा वाजण्यापूर्वी अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. आग वाढत असल्याचे लक्षात येताच तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच वाठोडा अग्निशमन केंद्राचे अधिकारी चंद्रशेखर रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अग्निशमन वाहने घटनास्थळी रवाना करण्यात आली. याशिवाय लाकडगंज अग्निशमन केंद्राचे एक वाहनही मदतीसाठी दाखल झाले. जवानांनी तातडीने आग विझवण्याचे काम सुरू केले. या आगीत दुरुस्तीसाठी उभी असलेली दोन चारचाकी वाहने पूर्णपणे जळून खाक झाली, तर आणखी एका वाहनाचे मोठे नुकसान झाले. तसेच भंगासाठी ठेवलेले एक वाहनही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. अग्निशमन दलाने संयुक्तपणे पाण्याचा मारा करून काही वेळातच आग नियंत्रणात आणली. त्यामुळे आग शेजारील इमारती व इतर मालमत्तेकडे पसरण्यापासून रोखण्यात यश आले. या तातडीच्या कारवाईमुळे मोठी आर्थिक हानी टळल्याचे सांगण्यात येत आहे.

COMMENTS