केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी नांदेड : 'नीट' (NEET) परीक्षेतील कथित महाघोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करून केंद्रीय शिक्षणमंत्री

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नांदेड : ‘नीट’ (NEET) परीक्षेतील कथित महाघोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत तातडीने राजीनामा द्यावा, तसेच नांदेड पोलीस भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेची सखोल चौकशी करण्यात यावी, या मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या वतीने नांदेड शहरात एक भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला.
डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा निषेध मोर्चा आयटीआय परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आला. खासदार प्रा. रवींद्र चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या मुख्य नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहारामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला असून, विद्यार्थ्यांचा परीक्षा पद्धतीवरील विश्वास डळमळीत करणाऱ्या या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
याचसोबत, नांदेड येथे नुकत्याच झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भात उमेदवारांनी उपस्थित केलेल्या शंका आणि तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशीही मागणी आंदोलकांनी लावून धरली. या मोर्चात माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर, ओबीसी प्रदेशाध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, सुरेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, महानगर जिल्हाध्यक्ष अब्दुल गफार, माजी जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, डॉ. दिनेश निखाते यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS