बीड : जिल्ह्यात शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाकडून असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण आणि नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण जून त

बीड : जिल्ह्यात शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाकडून असंघटित क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण आणि नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण जून ते डिसेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रगणकाला दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय ठेवली जाणार असून तिचा वापर केवळ सांख्यिकी निर्देशांक काढण्यासाठीच केला जाईल. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता प्रगणकाला खरी व अचूक माहिती द्यावी आणि या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्वेक्षणाचा अधिकृत शुभारंभ जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी शीला मिसाळ, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपायुक्त सुधाकर जाधव, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राधाकिशन इगारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जॉन्सन म्हणाले की, जिल्ह्यातील अचूक माहिती समोर येण्यासाठी नमुना निवड पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये नागरी भागातील ७८ आणि ग्रामीण भागातील ४२ अशा एकूण १२० घटकांची निवड करण्यात आली आहे. या निवडक क्षेत्रांमध्ये प्रशासनाचे प्रगणक घराघरांमध्ये आणि आस्थापनांमध्ये जाऊन थेट माहिती संकलित करणार आहेत. या सर्वेक्षणातून बीड जिल्ह्यातील बेरोजगारीचा दर, रोजगार उपलब्धता, महिला कामगारांची संख्या आणि असंघटित क्षेत्रातील उत्पादने आदींची माहिती संकलित करण्यात येणार आहे. या आकडेवारीचा सर्वात मोठा फायदा बीड जिल्ह्याचा सकल घरगुती उत्पादन (जीडीपी) काढण्यासाठी आणि भविष्यातील योजनांचे अचूक नियोजन करण्यासाठी होणार आहे.
केंद्र शासनाच्या NSSO मार्फत देशपातळीवर घेतले जाणारे हे सर्वेक्षण यावर्षी प्रथमच राज्याचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यस्तरावर आयोजित केले जात आहे, अशी माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपायुक्त सुधाकर जाधव यांनी दिली.

COMMENTS