Homeताज्या बातम्या

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी; महिलांचे मोबाईल पळवणारी टोळी दोन तासांत गजाआडतीन महिलांना लक्ष्य करणार्‍या अट्टल चोरांकडून 9 मोबाईल जप्त

बीड : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या महिलांचे मोबाईल हिसकावून दहशत निर्माण करणार्‍या अट्टल चोरांच्या टोळीला शिवाजीनगर पोलि

गायराण जमिनीच्या वादातून खून; आरोपी अवघ्या 6 तासांत जेरबंदगेवराई पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोघांना अटक, एक बालक ताब्यात
दौंडमधील गोळीबार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; परिसरात काढली जाहीर धिंड!
विदेशी घड्याळ अपहाराप्रकरणी आरोपीला अटक


बीड : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसाढवळ्या महिलांचे मोबाईल हिसकावून दहशत निर्माण करणार्‍या अट्टल चोरांच्या टोळीला शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या दोन तासांत जेरबंद केले. रविवारी 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने तीन महिलांचे मोबाईल पळवून आरोपींनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. मात्र पोलिसांच्या तत्पर आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे तिन्ही आरोपींना अटक करण्यात यश आले असून त्यांच्या ताब्यातून नऊ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
रविवारी दुपारच्या सुमारास मोटारसायकलवरून फिरणार्‍या तीन चोरट्यांनी शहरातील विविध भागांत महिलांना लक्ष्य केले. स्वराज्यनगर कमानीसमोर फोनवर बोलत जात असलेल्या अश्विनी कृष्णा सुर्वे यांच्या हातातील मोबाईल हिसकावून आरोपींनी पहिला गुन्हा केला. त्यानंतर जुना धानोरा रोडवरील बडगुजर कॉलनी परिसरात दळण घेऊन जात असलेल्या मिराबाई बाळू मुळीक यांचा मोबाईल पळविण्यात आला. याचदरम्यान के.एस.के. महाविद्यालयासमोरून जात असलेल्या एका परिचारिका महिलेच्या एप्रनच्या खिशातूनही मोबाईल चोरी करण्यात आला. एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक लंके यांच्या नेतृत्वाखाली पाच विशेष पथके तयार करण्यात आली. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून संशयितांचा शोध सुरू करण्यात आला. गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने अवघ्या दोन तासांत आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आवेश खान खाजा शेख (वय 22, रा. कानडी रोड, केज), गणेश श्रीराम मुंडे (रा. किल्ले धारूर) आणि ऋषिकेश लक्ष्मण वायबसे (वय 19, रा. कासारी, ता. केज) यांचा समावेश आहे.पोलीस तपासात आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. मोबाईल चोरी करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून चोरी केलेले मोबाईल थेट विकण्याऐवजी त्यांचे सुटे भाग करून विक्री केली जात असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण नऊ मोबाईल जप्त केले असून त्यातील काही मोबाईल इतर गुन्ह्यांशी संबंधित असल्याची शक्यता तपासली जात आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी संघटित टोळी तयार करून गुन्हे केल्याने त्यांच्यावर नव्या फौजदारी कायद्यानुसार कठोर कलमे लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या इतर मोबाईलच्या मालकांचा शोध घेऊन पुढील गुन्हे उघडकीस आणण्याचे काम सुरू आहे. ही उल्लेखनीय कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकट राम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दीपक लंके, पीएसआय काटकर, पीएसआय सागर सोन्ने तसेच पोलीस अंमलदार रवी आधाव, बाळू राहाडे, ज्ञानेश्वर मराडे, सचिन आगलावे, अशोक राडकर, दिलीप राठोड, अनिल घटमाळ आणि शुभम सोनवणे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
दोन तासांत गुन्ह्याचा छडा
तीन महिलांचे मोबाईल हिसकावून आरोपी पसार झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने पाच पथके तयार करून शहरभर नाकाबंदी केली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या दोन तासांत आरोपींना अटक करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

COMMENTS