कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरी येथील श्री स्वामी स्वरूपानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक पटव

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरी येथील श्री स्वामी स्वरूपानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दीपक पटवर्धन यांची, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची कार्यकारी अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक वासुदेव काळे यांनी ही माहिती दिली.
पुणे येथे १२ जून २०२६ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) संचालक सतीश मराठे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या फेडरेशनच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत सर्वानुमते दीपक पटवर्धन यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीनंतर पटवर्धन यांनी स्वतः पुढाकार घेत काका कोयटे यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून संघटनेत सक्रिय राहावे, अशी विनंती केली. संचालक मंडळाने या प्रस्तावाला एकमुखी पाठिंबा देत कोयटे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले.
निवडीनंतर बोलताना अध्यक्ष दीपक पटवर्धन म्हणाले, “काका कोयटे यांचा पतसंस्था चळवळीतील प्रदीर्घ अनुभव, राज्यभरातील व्यापक संपर्क आणि पतसंस्थांमधील लोकप्रियता लक्षात घेता त्यांचे मार्गदर्शन राज्य फेडरेशनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून कार्यरत राहण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधित्वही कायम ठेवावे, असा निर्णय घेण्यात आला आहे.” काका कोयटे यांनी राज्यस्तरीय सहकारी पतसंस्था चळवळीची ही मोठी जबाबदारी स्वीकारल्यामुळे राज्यभरातील सहकार क्षेत्रात आणि पतसंस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS