राहुरी : आपल्या निर्भीड आणि निपक्षपाती लेखणीच्या जोरावर मागील ३० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात अविरत सामाजिक सेवा बजावणारे 'लोकस्वातंत्र्य' वृ

राहुरी : आपल्या निर्भीड आणि निपक्षपाती लेखणीच्या जोरावर मागील ३० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात अविरत सामाजिक सेवा बजावणारे ‘लोकस्वातंत्र्य’ वृत्तपत्राचे संपादक कर्णा जाधव यांना ‘आधार फाउंडेशन’ व ‘एस. आर. २४ न्यूज’च्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक ‘नवा मराठा’चे संपादक व अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष गुंदेचा हे होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पत्रकार कर्णा जाधव यांना सन्मानपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. संपादक कर्णा जाधव हे आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्याने आवाज उठवण्यासाठी ओळखले जातात. यापूर्वीही त्यांना चार वेळा विविध नामांकित संस्थांच्या वतीने ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून साई आदर्श संस्थेचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, राहुरीचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ, वंचितचे अध्यक्ष संतोष चोळके, यशवंत सेनेचे अध्यक्ष विजय तमनर, मार्केट कमिटीचे व्हा. चेअरमन रामदास बाचकर, शिवसेना नेते रावसाहेब खेवरे, शिवसेना (शिंदे गट) शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आधार फाउंडेशन व एस. आर. २४ न्यूजचे आयोजक रमेश खेमनर आणि संस्थेच्या अध्यक्षा ह.भ.प. राधिका खेमनर यांच्यासह आयोजक सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS