संगमनेर : भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'खेती बचाव' अभियान कार्यक्रमांतर्गत माजी कृषीमंत्री बाळासाहेब थ

संगमनेर : भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘खेती बचाव’ अभियान कार्यक्रमांतर्गत माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात जमीन सुपीकता, शाश्वत शेती आणि शेतकरी जनजागृतीबाबत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
या कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. एस. बी. खरबडे, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन नलावडे, कृषी कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. कदम, प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, डॉ. रवी आंधळे, सोनार सर, प्रबंधक प्रा. जी. बी. बाचकर, प्रमोद देशमुख, सागर वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते. गुंजाळवाडी येथे सुरू असलेल्या विश्व गौरव विभूषित परमपूज्य स्वामी गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या महाविद्यालयाने भाविक व शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची विस्तृत माहिती दिली. या प्रदर्शनाला राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, दिलीपराव शिंदे यांनीही भेट दिली.
याप्रसंगी डॉ. एस. बी. खरबडे यांनी खेती बचाव अभियानाचे मुख्य उद्दिष्ट स्पष्ट करताना जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी मृदा परीक्षण, सेंद्रिय खतांचा वापर, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तर प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ यांनी बदलत्या हवामानात शाश्वत शेती पद्धतीचा स्वीकार करून पर्यावरण संवर्धनासह उत्पादन वाढीचे उपाय सांगितले. या अभियानामुळे पीक संरक्षण व मृदा संवर्धनाची अत्यंत उपयुक्त माहिती मिळाल्याची भावना शेतकरी आणि भाविकांनी व्यक्त केली.

COMMENTS