Homeबीड

जुन्या परळी शहर गावभागात सीसीटीव्ही बसवा; भुरट्या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करापोलीस निरीक्षक नाचन यांना नागरिकांचे निवेदन; वर्षभरानंतरही मागणी प्रलंबित

परळी शहरातील जुन्या गावभागात वाढत्या भुरट्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात तात्काळ सीसीटी

राशीनमध्ये हातभट्टीवर पोलिसांचा छापा७८० लिटर रसायन व दारू नष्ट
‘हात-पाय तोडले तरच लोकांना कायद्याचा धाक बसेल’; कर्नाटक उच्च न्यायालयाची टिप्पणी
दमिरर..!



परळी शहरातील जुन्या गावभागात वाढत्या भुरट्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गुन्हेगारीवर आळा घालावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाचन यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
गणेश पार, उखळवेस, होळकर चौक, भीमनगर, जगतकर गल्ली, प्रबुद्धनगर, रमाईनगर, साठेनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह चौक, देवी मंदिर परिसर आणि आपना चौक या भागांमध्ये वारंवार घडणार्‍या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यापूर्वीही या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत शहर पोलीस ठाणे, नगरपरिषद परळी वैजनाथ आणि पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड येथे निवेदने देण्यात आली होती. मात्र वर्षभर उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवेदनात उखळवेस, अण्णाभाऊ साठे समाज मंदिर परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह चौक, भीमनगर, जगतकर गल्ली, प्रबुद्धनगर चौक आणि आपना चौक येथे अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पोलीस व नगरपालिकेने या गंभीर प्रश्नाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात दुचाकींमधील पेट्रोल चोरी, रिक्षांमधील बॅटरी चोरी, पाण्याच्या मोटारी, गॅस सिलिंडर, सायकली, गार्डन पाईप, पाण्याच्या टाक्या, बांधकाम साहित्य, स्टील साहित्य, किराणा दुकानांतील रोकड, बोअरवेलच्या वायर व मशीन, मोबाईल फोन तसेच चप्पल-बूट चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि चांदीच्या वस्तू चोरीला जाण्याच्या घटनांमुळेही नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. परिसरात अवैध हातभट्टी दारू विक्रीमुळे काही तरुण व्यसनाधीन होत असून, त्यातूनच चोरीच्या घटनांना चालना मिळत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून परिसर गुन्हेमुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याशिवाय जुन्या गावभागात रात्रीच्या वेळी नियमित पोलीस गस्त वाढविण्यात यावी, दिवसातून किमान दोन वेळा पेट्रोलिंग करण्यात यावे तसेच गणेश पार येथील बंद पडलेली पोलीस चौकी तात्काळ सुरू करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, पोलीस गस्त वाढविणे आणि चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणणे यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या वेळी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, बाबा शिंदे, कामगार नेते गौतमभाई आगळे, प्रल्हाद सुरवसे, संपादक बालाजी जगतकर, वैजनाथ कळसकर, राजाभाऊ जगतकर, प्रशांत रोडे, देविदास जंगले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS