लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपीला अंभोरा पोलिसांकडून पाठीशी घातले जात असल्याचा गंभीर आरोप करत गहुखेल य

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपीला अंभोरा पोलिसांकडून पाठीशी घातले जात असल्याचा गंभीर आरोप करत गहुखेल येथील पीडित मातेसह कुटुंबीयांनी गुरुवारी (दि. 11) सकाळपासून आष्टी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.सोनाली सुभाष आहेरकर असे उपोषणकर्त्या मातेचे नाव असून,या आंदोलनामुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गहुखेल येथील रहिवासी सोनाली आहेरकर यांच्या अल्पवयीन मुलीला 30 मे 2026 रोजी तागडखेल येथील रहिवासी केशव गव्हाणे यांचा मुलगा शिवम केशव गव्हाणे याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर पीडित मातेने तातडीने अंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन शिवम गव्हाणे याच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली होती. मात्र, मुख्य संशयिताचे नाव माहित असूनही पोलिसांनी त्याला गुन्ह्यातून वगळून अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 172/2026 अन्वये गुन्हा दाखल केल्याचा आरोप उपोषणकर्त्या महिलेने केला आहे.गुन्हा दाखल झाल्यापासून पीडित कुटुंबीय दररोज पोलीस ठाण्यात जाऊन मुलीचा शोध घेण्याची मागणी करत आहेत. मात्र,पोलीस या गंभीर प्रकरणाची अपेक्षित गांभीर्याने दखल घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याशिवाय,संशयित शिवम गव्हाणे यांच्या नातेवाईकांची साधी चौकशीसुद्धा करण्यात आलेली नाही.उलट, पोलिसांतील गुन्हा मागे घेतल्यासच मुलगी तुमच्या ताब्यात दिली जाईल,असा निरोप आरोपीच्या कुटुंबीयांकडून हस्ते-परहस्ते पाठवून धमकावले जात असल्याचा दावाही पीडित कुटुंबाने केला आहे. या धमकीबाबत पोलिसांना माहिती देऊनही कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे आहेरकर यांनी सांगितले. मुलीचा अद्याप शोध लागलेला नसल्याने आणि पोलिसांच्या निष्काळजी भूमिकेमुळे कुटुंबीय तीव्र मानसिक तणावाखाली आले आहेत.अंभोरा पोलिसांकडून न्याय मिळण्याची आशा संपुष्टात आल्याने अखेर सोनाली आहेरकर यांनी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. मुलीचा सुरक्षित शोध लागून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि काय पावले उचलते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
‘गुन्हा मागे घ्या; मुलगी परत मिळेल!’
पोलिसांत दाखल केलेला गुन्हा मागे घेतल्यासच तुमची मुलगी तुमच्या ताब्यात दिली जाईल, असा कथित निरोप संशयिताच्या कुटुंबीयांकडून पीडित कुटुंबाला देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, पीडित कुटुंबाने याबाबत पोलिसांकडेही माहिती दिल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कुटुंबीयांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
अंभोरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?..
पीडित कुटुंबाच्या आरोपांनुसार, अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणात मुख्य संशयिताचे नाव तक्रारीत स्पष्टपणे नमूद असतानाही त्याचा गुन्ह्यात समावेश करण्यात आला नाही. तसेच मुलीचा शोध घेण्यात व संशयिताच्या नातेवाईकांची चौकशी करण्यातही पोलिसांकडून अपेक्षित तत्परता दाखवली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय धमकी दिल्याच्या तक्रारींकडेही दुर्लक्ष झाल्याचा दावा पीडित कुटुंबाने केला आहे. या सर्व आरोपांमुळे अंभोरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

COMMENTS