श्रीगोंदा : विजेच्या वितरण व्यवस्थेला अडथळा ठरत असल्याने तोडण्याची वेळ आलेल्या श्रीगोंदा शहरातील स्टेशन रोड परिसरातील सुमारे १५ वर्षे जुन्या वडाच

श्रीगोंदा : विजेच्या वितरण व्यवस्थेला अडथळा ठरत असल्याने तोडण्याची वेळ आलेल्या श्रीगोंदा शहरातील स्टेशन रोड परिसरातील सुमारे १५ वर्षे जुन्या वडाच्या झाडाला नवे जीवन देण्याचा स्तुत्य उपक्रम येथील वृक्षप्रेमींनी राबविला. ‘जगतगुरू संत तुकाराम महाराज वृक्ष संवर्धन समिती’च्या पुढाकारातून क्रेनच्या साहाय्याने हे झाड सुरक्षितपणे उपटून वन विभागाच्या जागेत यशस्वीपणे पुनर्रोपित करण्यात आले.
स्टेशन रोडवरील हे वडाचे झाड विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरत असल्याने ते पूर्णपणे हटविणे आवश्यक बनले होते. मात्र, झाड तोडण्याऐवजी त्याचे पुनर्रोपण करून त्याला नवसंजीवनी देण्याचा निर्णय वृक्षप्रेमींनी घेतला. समितीचे अध्यक्ष नवनाथ दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रक्रियेसाठी जेसीबीच्या साहाय्याने मोठा खड्डा खोदण्यात आला, ज्यासाठी धनराज कोंथबीरे आणि जमीर जकाते यांनी विशेष सहकार्य केले. तसेच श्रीगोंदा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांनी ५,००० लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकर उपलब्ध करून देत या उपक्रमाला मोलाची मदत केली.
सुमारे तीन फूट व्यास आणि दहा फूट उंची असलेल्या या वडाच्या झाडाचे क्रेनच्या साहाय्याने स्थलांतर करण्यात आले. या पर्यावरणपूरक उपक्रमात माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, नानासाहेब कोंथबीरे, ऋतिक शिंदे, उमेश परहर, संजय पटवा, प्रा. बापू देवकर, ॲड. सुनील दरेकर, गौरव मेहेत्रे आणि झहीर जकाते यांनी सक्रिय सहभाग नोंदवत श्रमदान केले. झाडाला नवजीवन मिळाल्याचा आनंद व्यक्त करत सर्व स्तरांतून या प्रयत्नाचे कौतुक होत आहे.

COMMENTS