नांदेड : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुदखेड तालुक्यातील गोपाळचावडी व बाबुळगाव ग्रामपंचायतींचे वार्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आ

नांदेड : आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुदखेड तालुक्यातील गोपाळचावडी व बाबुळगाव ग्रामपंचायतींचे वार्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अधिपत्याखाली, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या आदेशानुसार तसेच तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ग्रामसभेत ही आरक्षण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली.
गोपाळचावडी ग्रामपंचायत (११ सदस्य): गावाची लोकसंख्या ४,०६८ असून येथे एकूण चार वार्ड आहेत. एकूण ११ जागांपैकी ६ जागा महिलांसाठी तर ५ जागा पुरुषांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. या आरक्षण प्रक्रियेच्या ग्रामसभेस मंडळ अधिकारी संतोष आकुसकर, तलाठी योगिता अन्नमवार व ग्रामसेवक वर्षा पाटील यांच्यासह माजी सरपंच सुरेखा प्रदीप लाखे, माजी उपसरपंच साहेबराव शेलूरकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
बाबुळगाव ग्रामपंचायत (९ सदस्य): गावाची लोकसंख्या २,८७० असून येथे तीन वार्ड आहेत. एकूण ९ जागांपैकी ५ जागा महिलांसाठी व ४ जागा पुरुषांसाठी आरक्षित आहेत. यामध्ये प्रवर्गनिहाय अनुसूचित जातीसाठी (SC) १ जागा, इतर मागासवर्गीयांसाठी (OBC) २ जागा, तर उर्वरित ६ जागा सर्वसाधारण (General) प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. या ग्रामसभेस ग्रामसेवक राजू कदम, माजी सरपंच पुंडलिक मस्के, दत्ता मोरे, पोलीस पाटील संतोष मोरे उपस्थित होते.
घोषित करण्यात आलेल्या वार्ड आरक्षणासंदर्भात काही हरकती व सूचना असल्यास त्या स्वीकारण्यासाठी १७ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच १९ ते २५ जून या कालावधीतही हरकती नोंदवता येतील. आरक्षण प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

COMMENTS