सोनई : महाराष्ट्रात उत्पादन, साठवणूक व विक्रीस बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूचा साठा बाळगून विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका तरुणाविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात

सोनई : महाराष्ट्रात उत्पादन, साठवणूक व विक्रीस बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूचा साठा बाळगून विक्रीसाठी ठेवणाऱ्या एका तरुणाविरुद्ध सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत ५३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी उज्ज्वला पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. सुहास भुसारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १० जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोनई-राहुरी मार्गावरील महावितरणच्या उपकेंद्र परिसरातील आरोपीच्या राहत्या घरावर अन्न सुरक्षा विभाग व पोलिसांनी संयुक्त छापा टाकला. घरातील दोन खोल्यांमध्ये विविध प्रकारच्या सुगंधी तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
कारवाईदरम्यान काळ्या, निळ्या, चंदेरी व सोनेरी रंगाच्या वेष्टनातील सुगंधी तंबाखूची ५०० ग्रॅम वजनाची अनेक पाकिटे, पाच किलो वजनाची पाकिटे तसेच इतर प्रकारचा माल असा एकूण ५३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार सुगंधी तंबाखू व तयार मावा यांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी आहे. मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या या पदार्थांचा आर्थिक फायद्यासाठी साठा केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

COMMENTS