Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’; प्रिस्क्रिप्शनशिवाय नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दोन मेडिकलवर छापा

नांदेड : शहरातील महाविद्यालयीन तरुण आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) नशा आणणाऱ्या औषधांची विक्री

राज्यभरात एफडीएची (FDA) धडक मोहीम; ७३ लाखांचा औषध साठा जप्त, आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती
मुंबईतून निकृष्ट दर्जाचे 11 हजार लिटर दूध जप्त
चकलांब्यात अन्न भेसळीचा आरोप; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईकडे ग्रामस्थांचे लक्षतुकाराम मुंढे साहेब, चकलांब्यातही धडक मोहीम राबवा – नागरिकांची मागणी

नांदेड : शहरातील महाविद्यालयीन तरुण आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय (प्रिस्क्रिप्शन) नशा आणणाऱ्या औषधांची विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. वजिराबाद पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) संयुक्त कारवाई करत दोन नामांकित मेडिकल स्टोअर्सवर छापे टाकून तब्बल १ हजार ५४० ‘प्रिगाबालिन’ (Pregabalin) कॅप्स्युल्स जप्त केल्या. जप्त साठ्याची किंमत ३८ हजार ३८ रुपये असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलीस अधीक्षक अभिनश कुमार यांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहिमेअंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली. वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहरातील ‘ऑक्सिजन मेडिकल’ आणि ‘हेल्थ ओके मेडिकल’ येथे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय तरुणांना नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या विकल्या जात आहेत.

माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अशोक राठोड यांच्या सहकार्याने बनावट ग्राहक पाठवला. संबंधित मेडिकल चालकांनी कोणतीही डॉक्टरांची चिठ्ठी किंवा बिल न मागता ‘Pregalab 300’ या औषधाच्या गोळ्या विकल्याचे समोर आले. त्यानंतर तात्काळ दोन्ही दुकानांवर छापे मारून मोठा साठा जप्त करण्यात आला. या औषधांच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील कोणतीही वैध कागदपत्रे मेडिकल चालक सादर करू शकले नाहीत.

दरम्यान, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अशा औषधांची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला असून नागरिकांनीही अशा प्रकारांची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS