देवळाली प्रवरा : ग्रामीण भागातील बदलती जीवनशैली, ढासळत चाललेली वाचनसंस्कृती आणि ग्रामसंस्कृतीसमोरील नव्या आव्हानांवर साहित्यिकांनी गंभीर चिंता

देवळाली प्रवरा : ग्रामीण भागातील बदलती जीवनशैली, ढासळत चाललेली वाचनसंस्कृती आणि ग्रामसंस्कृतीसमोरील नव्या आव्हानांवर साहित्यिकांनी गंभीर चिंता व्यक्त केली. देवालयांमध्ये वाढती गर्दी आणि वाचनालयांतील घटती उपस्थिती हे समाजातील बदलत्या प्रवृत्तीचे द्योतक असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात ‘बदलते ग्रामीण जीवन आणि ग्रामसंस्कृती’ या विषयावरील परिसंवादात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
“शाळांवर पत्रे आणि मंदिरांवर सोन्याचे कळस चढत आहेत. माणूस अधिकाधिक असुरक्षित होत असून या असुरक्षिततेचा फायदा घेणारे धर्माचे ठेकेदार तयार होत आहेत. समाजात विवेक जागविण्यासाठी साहित्यिकांनी लेखणी झिजवण्याची गरज आहे,” असे स्पष्ट मत डॉ. कळमकर यांनी मांडले.
दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी बदलत्या ग्रामीण वास्तवावर भाष्य करताना सांगितले की, “एकेकाळी एकोप्याने राहणारे लोक आता संशयाने एकमेकांकडे पाहू लागले आहेत. विविध झेंड्यांच्या राजकारणामुळे विभागणी वाढत आहे. युवा पिढीला कष्टाची लाज वाटू लागली असून विकासकामांमुळे विस्थापित झालेल्यांचे प्रश्नही गंभीर बनले आहेत.”
साथी शिवाजी नाईकवाडी यांनी ग्रामीण युवकांचे शहरांकडे वाढते स्थलांतर ही चिंतेची बाब असल्याचे सांगितले. “गावातील तरुण रोजगारासाठी शहरांकडे धाव घेत आहेत. त्यांना योग्य दिशा देण्याबरोबरच शहरात राहणाऱ्या लोकांनीही आपल्या मायमातीशी नाते कायम ठेवले पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.
या परिसंवादाला उपजिल्हाधिकारी गणेश मरकड, प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब सावंत यांनी केले. प्रा. डॉ. अनिल गर्जे यांनी सूत्रसंचालन केले तर साहेबराव तुपे यांनी आभार मानले.
संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे, शब्दगंध साहित्य परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्यासह अनेक साहित्यप्रेमींनी या परिसंवादास उपस्थिती लावली.

COMMENTS