Homeताज्या बातम्या

सरसकट कर्जमाफीसाठी नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम  शिंदे शिवसेना शेतकरी सेनेचे राहुरीत आंदोलन

देवळाली प्रवरा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, ऊस उत्पादकांची थकीत बिले तातडीने अदा करावीत तसेच कृषी वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा या

शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखला कांद्याला भाव नसल्याने  कांदा उत्पादक आक्रमक  
अचानक पावसाचा कांदा उत्पादकाला जबर फटका
कर्जमाफीच्या अटीशर्ती रद्द करा या मागणीसाठी किसान सभेची निदर्शने


देवळाली प्रवरा : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, ऊस उत्पादकांची थकीत बिले तातडीने अदा करावीत तसेच कृषी वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी शिंदे शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने सोमवारी (दि. ९ जून) राहुरी येथील बाजार समितीसमोर नगर-मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शिंदे शिवसेना शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
 आंदोलनादरम्यान बोलताना रविंद्र मोरे यांनी राज्य सरकारच्या कृषी धोरणांवर जोरदार टीका केली. “भारत हा कृषिप्रधान देश असून शेतकरी हा जगाचा राजा मानला जातो. मात्र सध्याच्या सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. सरकारने दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासाठी घालण्यात आलेल्या विविध अटींमुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. हे धोरण शेतकरीविरोधी असून सरसकट कर्जमाफी झाली नाही तर मुंबईतील वर्षा बंगल्यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
 यावेळी प्रकाश देठे यांनीही शेतकरी प्रश्नांवर भाष्य करत सरकारवर टीका केली. “आज शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे बोलणारे फार कमी लोक उरले आहेत. शेतकरी प्रश्नांवर सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. अन्यथा परिस्थिती आणखी गंभीर होईल,” असे ते म्हणाले.
आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके, बाळासाहेब जाधव, राजेंद्र लोंढे, किरण कडू, अमोल मोढे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. उपस्थितांनी आपल्या मनोगतातून शेतकऱ्यांच्या समस्या मांडत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
 त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन सादर केले. सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या चक्काजाममुळे नगर-मनमाड राज्य महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.

COMMENTS