कर्जत : उन्हाळी आवर्तन क्रमांक २ अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने कर्जत तालुक्यातील विविध पाझर तलाव, बंधारे आणि पाणीपु

कर्जत : उन्हाळी आवर्तन क्रमांक २ अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने कर्जत तालुक्यातील विविध पाझर तलाव, बंधारे आणि पाणीपुरवठा स्रोतांमध्ये पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू ठेवली असून ६ जून २०२६ पर्यंत तालुक्यातील २५ ठिकाणी पाणी सोडण्यात आले आहे. अशी माहिती प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी दिली.
पाटील पुढे म्हणाले की, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच संबंधित ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.
यामध्ये चिलवडी, देशमुखवाडी, गालांडवाडी, पाटेवाडी, थेरवडी, दूरगाव व पळसाओढा (कोळवडी-वडगाव तानपुरा) येथील पाझर तलावांसह बेनवडी, चापडगाव, कोरेगाव, खातगाव, लोणी मसदपूर, आंबीजळगाव, अळसुंदा, माळंगी, डोंबाळवाडी, शेगुड आदी ठिकाणच्या पाणीपुरवठा विहिरीलगतच्या बंधाऱ्यांमध्ये तसेच विविध नदीपात्रांमध्ये पाणी सोडण्यात आले आहे.
सध्या सुरू असलेले कुकडीचे आवर्तन हे केवळ पिण्याच्या पाण्यासाठी असून त्याचा वापर शेती किंवा इतर कारणांसाठी करू नये, असा स्पष्ट इशारा उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी दिला आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम राहण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने व जपून वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत विविध जलस्रोतांमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आगामी काळातही पाणीपुरवठ्याची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या या आवर्तनाचा गैरवापर होणार नाही याची दक्षता ग्रामपंचायत, पाणीपुरवठा विभाग आणि महसूल प्रशासनाकडून घेतली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

COMMENTS