Homeताज्या बातम्या

रायचूर एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न फसलाधाडसी महिलेच्या प्रसंगावधानाने चोरट्याचा डाव उधळला; रेल्वे सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

नांदेड : रायचूर एक्सप्रेसमधील एका धाडसी महिला प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे चोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात आला असून या घटनेने रेल्वेतील प्रवाश

गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन
शेतरस्त्यावर अतिक्रमण; तहसीलदारांचे चौकशी व कारवाईचे आदेशस्थानिक महसूल अधिकार्‍यांवर अविश्वास; बाहेरील अधिकार्‍यांकडून चौकशीची मागणी
सालेवडगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत


नांदेड : रायचूर एक्सप्रेसमधील एका धाडसी महिला प्रवाशाच्या प्रसंगावधानामुळे चोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात आला असून या घटनेने रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे चोरीचा प्रयत्न होत असताना रेल्वे सुरक्षा दलाचे जवान अथवा इतर जबाबदार कर्मचारी डब्यात उपस्थित नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला असून रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रायचूर एक्सप्रेस  क्रमांक 17663 ही गाडी मंगळवारी पहाटेच्या सुमारास निजामाबाद ते नवीपेठ दरम्यान धावत होती. गाडीच्या एस वन डब्यात एक महिला आपल्या कुटुंबासह प्रवास करत होती. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एका चोरट्याने संधी साधत झोपलेल्या महिलेची पर्स चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र पर्स खेचताना संबंधित महिलेला तात्काळ जाग आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत महिलेने क्षणाचाही विलंब न करता चोरट्याचा पाठलाग सुरू केला. तिने डब्यात मोठ्याने आरडाओरड केल्यामुळे इतर प्रवाशांनाही जाग आली. प्रवासी जागे होत असल्याचे लक्षात येताच चोरटा गोंधळला. पकडले जाण्याची भीती निर्माण झाल्याने त्याने चोरी केलेली पर्स तसेच स्वतःची पिशवी चालत्या रेल्वेच्या दाराजवळच टाकून दिली. काही क्षणांत गाडीचा वेग कमी होताच त्याने थेट रेल्वेतून खाली उडी मारत अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला. महिलेच्या धाडसामुळे तिचे आर्थिक नुकसान टळले आणि चोरट्याचा डाव पूर्णपणे फसला.  या प्रसंगानंतर डब्यातील अनेक प्रवाशांनी संबंधित महिलेच्या धैर्याचे कौतुक केले. मात्र या घटनेने रेल्वे सुरक्षेच्या दाव्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार रात्रीच्या वेळी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांची गस्त अत्यंत अपुरी असल्याचे दिसून आले. चोरीसारखी गंभीर घटना घडत असताना आरपीएफचा एकही जवान डब्यात फिरकला नसल्याचा आरोप करण्यात आला. जर यापेक्षा मोठी दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. याशिवाय तिकीट तपासनीसाची भूमिकाही प्रवाशांच्या टीकेचा विषय ठरली. सुरुवातीला एक फेरी मारल्यानंतर टीसी पुन्हा डब्यात आल्याचे दिसले नाही. नांदेडजवळ आल्यानंतर टीसी डब्यात आल्यानंतर प्रवाशांनी त्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली. मात्र तत्काळ प्रतिसाद यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. दरम्यान या घटनेने रेल्वेतील मूलभूत सुविधांच्या प्रश्नालाही पुन्हा वाचा फोडली आहे. रेल्वेचे भाडे वाढत असताना प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळत  ल्याची तक्रार सातत्याने होत आहे. संबंधित गाडीतील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असल्याचे प्रवाशांनी सांगितले.  या समस्यांबाबत काही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे ऑनलाइन माध्यमातून तक्रारीही नोंदवल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या तक्रार निवारण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनेबाबत मध्य रेल्वे विभागातील विभागीय सुरक्षा आयुक्तांशी संपर्क साधला असता संबंधित रेल्वे सिकंदराबाद विभागाच्या कार्यक्षेत्रात येत असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाकडे आहे याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान या प्रकारानंतर गाडीतील प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रात्रीच्या वेळी रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी आरपीएफ जवानांची नियमित गस्त वाढविण्यात यावी. संवेदनशील मार्गांवर विशेष सुरक्षा व्यवस्था उभारावी. तसेच निष्काळजीपणा करणार्‍या संबंधित कर्मचार्‍यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. रायचूर एक्सप्रेसमधील ही घटना एका धाडसी महिलेच्या प्रसंगावधानामुळे सुखरूप संपली असली तरी रेल्वे प्रशासनाने या घटनेतून धडा घेऊन सुरक्षा व्यवस्थेचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज व्यक्त होत आहे. अन्यथा भविष्यात अशा घटना अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे

COMMENTS