बेन्टेक्सच्या दागिन्यांवर दिले कोट्यवधीचे कर्ज ; नगर अर्बन शेवगाव शाखेतील 5 सोन्याच्या पिशव्या निघाल्या बनावट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेन्टेक्सच्या दागिन्यांवर दिले कोट्यवधीचे कर्ज ; नगर अर्बन शेवगाव शाखेतील 5 सोन्याच्या पिशव्या निघाल्या बनावट

सोने तारण ठेवून त्याच्या 70-80 टक्के रकमेचे कर्ज बहुतांश आर्थिक संस्था देतात. पण नगर अर्बन बँकेने चक्क बेन्टेक्स सोने तारण घेऊन त्यावर कोट्यवधीचे कर्ज वाटले आहे.

जनसामान्यांचा विकास हेच माझे ध्येय ः आमदार मोनिकाताई राजळे
राज्यात महाविकास आघाडी असताना काँग्रेस- राष्ट्रवादीत आरोपांच्या फैरी… विनयभंगाचा गुन्हा
राहुरी फॅक्टरीत महावितरण अधिकार्‍यास मारहाण

अहमदनगर/प्रतिनिधी-सोने तारण ठेवून त्याच्या 70-80 टक्के रकमेचे कर्ज बहुतांश आर्थिक संस्था देतात. पण नगर अर्बन बँकेने चक्क बेन्टेक्स सोने तारण घेऊन त्यावर कोट्यवधीचे कर्ज वाटले आहे. बँकेच्या शेवगाव शाखेतील सोनेतारणाच्या 364 पिशव्यांपैकी फक्त पाचच पिशव्या लिलावासाठी उघडल्यावर त्यात चक्क बेन्टेक्सचे दागिने सापडले. त्यामुळे प्रशासनाने पुढचा लिलाव व पिशव्या उघडण्याची प्रक्रिया स्थगित केली. या प्रकारामुळे बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता याबाबत बँकेचे प्रशासक व प्रशासन काय भूमिका घेते, याची उत्सुकता व्यक्त होत आहे. 

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत बनावट सोने तारण प्रकरणाचा मुद्दा गेल्या दोन वर्षांपासून गाजत आहे. दोन वर्षांपूर्वी शेवगाव शाखेतील लिलावाच्यावेळी 3 पिशव्या उघडल्यावर व त्यात बनावट सोने निघाल्यावर तो लिलाव स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर राहिलेल्या 364 पिशव्यांतील सोन्याचा लिलाव बुधवारी बँकेच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. संबंधित कर्जदारांनी पैसे भरून सोने सोडवून नेले नसल्याने बँकेने या पिशव्यांतील सोन्याचा लिलाव जाहीर केला होता. त्यानुसार त्याचा लिलाव सुरू झाला असताना पहिल्या पाच पिशव्यांमध्ये सोन्याच्या ऐवजी बेन्टेक्स दागिने आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान बँकेच्या अधिकार्‍यांनी लिलाव प्रक्रिया थांबवल्यामुळे अनेक तर्कवितर्क सुरु झाले आहे व शेवगावच्या पिशव्यांमध्ये बनावट सोने असल्यामुळे 3 ते 4 कोटी रुपयांचे हे कर्जवाटप आता वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नगर अर्बन बँक अनेक वर्षापासून वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अधिपत्याखाली या बँकेचा कारभार केला जात होता. या बँकेच्या अनेक तक्रारी राज्य व केंद्र स्तरावर केलेल्या आहे. त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे सुद्धा त्यानंतर दाखल झालेले आहे. 3 कोटीच्या चिल्लर घोटाळ्याप्रकरणी येथील कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर 22 कोटी रुपयांचे बोगस कर्ज देऊन आर्थिक घोटाळे केल्याप्रकरणी पुण्याच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने पिंपरी चिंचवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व या दोन्ही प्रकरणी काही माजी संचालकांसह काही कर्मचार्‍यांना अटकही झाली आहे व या प्रकरणांचा तपास सध्या सुरू आहे.

तीन वर्षांपूर्वीच संशय व्यक्त

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेमध्ये शाखा अधिकारी गोरक्ष शिंदे यांनी 2018 साली बँकेच्या प्रशासनाला शेवगाव शाखेमध्ये साधारणतः 2018 पासून एकाच व्यक्तीच्या नावावर या सोने पिशव्या असाव्यात व त्यात बनावट सोने असावे, अशी शंका उपस्थित करून त्यांनी त्या वेळेला लेखी पत्र देऊन  बँकेच्या प्रशासनास दिले होते व या विषयी लक्ष वेधले होते. पण या प्रकरणाची चौकशी करण्यात आली नव्हती. त्या वेळेला नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र गांधी व पोपट लोढा यांनी बँकेला लेखी पत्र लिहून या सर्व प्रकरणाची  चौकशी करण्याची मागणी 2019 मध्ये केली होती. समितीच्या वतीने या प्रकरणासंदर्भात निवेदने देण्यात आले होते. मात्र, बँकेवर प्रशासक नियुक्त केल्यामुळे या प्रकरणांमध्ये कोणीही लक्ष घालण्यास तयार नव्हते. त्या नंतर बँक बचाव कृती समितीने आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर बँकेच्यावतीने या सोनेतारणाचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला व रितसर जाहिरात देऊन बुधवारी लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार बँकेच्या आवारात त्या पिशव्या फोडण्यात येत असताना पहिल्या पाच पिशव्यांमध्ये सोन्याऐवजी बेन्टेक्स दागिने असल्याचे दिसून आले व एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन वर्षापासून शेवगावचे सोने तारण विषय गाजत आहे. बनावट सोन्यामुळे बँकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. बँकेने या सोन्याच्या लिलावाची तारीख जाहीर केली त्यावेळी काही कर्जदारांनी बँकेत येऊन संबंधित सोने त्यांचे नसल्याचे व त्यांनी ठेवले नसल्याचेही सांगितले होते. या पार्श्‍वभूमीवर, हे सोने तारण म्हणून कोणी ठेवले, त्या वेळेला कोण गोल्ड व्हॅल्युअर होता, कोणाच्या सांगण्यावरून हे कर्ज देण्यात आले तसेच त्या वेळेला कोण-कोण अधिकारी त्या ठिकाणी होते याचा सर्व तपास आता करावा लागणार आहे. दरम्यान, शेवगाव शाखेमध्ये बनावट सोने तारण आता उघड झाले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यावेळी साधारणतः तीन ते चार कोटी रुपयांचे कर्ज या सोनेतारणावर देण्यात आलेले होते. आता बनावट सोने निघाल्यामुळे प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

प्रशासनाचा बोलण्यास नकार

नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतील सोने तारण लिलावाच्या दरम्यान बेन्टेक्सचे दागिने सापडल्यामुळे प्रशासनाने तात्काळ लिलाव न करण्याचा निर्णय घेऊन ही प्रक्रिया थांबवली. विशेष म्हणजे लिलावात सोने घेण्यासाठी या ठिकाणी आलेले सर्व सोन्याचे व्यापारी त्यानंतर निघून गेले. या प्रकारानंतर बँकेच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता, आम्ही आताची माहिती देणार नाही, आम्हाला आता या प्रकरणाची चौकशी करावी लागेल, असे फक्त प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

COMMENTS