देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या संशयास्पद व बेकायदेशीर ड्रोनच्या हालचालींचा शोध घेण्या

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या संशयास्पद व बेकायदेशीर ड्रोनच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाची विशेष मोहीम सुरूच असून, आता या ड्रोनची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी तीन ड्रोन पाडले असल्याने संशयास्पद ड्रोनची संख्या घटली आहे. त्यामुळे परिसरात निर्माण झालेले भीतीचे वातावरण काही प्रमाणात कमी झाले असले, तरी या ड्रोनचा उगम, मालक आणि उद्देश अद्यापही स्पष्ट न झाल्याने गूढ कायम आहे.
सोमवारी रात्री राहुरी पोलिसांनी ‘मिशन अँटी ड्रोन’ अंतर्गत पुन्हा एकदा विशेष शोधमोहीम राबविली. या मोहिमेत अत्याधुनिक अँटी-ड्रोन गन तसेच लेझर गनच्या सहाय्याने आकाशातील संशयास्पद हालचालींचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ड्रोनची उंची, दिशा आणि हालचाली यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष उपकरणांचा वापर केला गेला.
या मोहिमेत राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस कर्मचारी सूरज गायकवाड यांच्यासह पुणे येथील अँटी-ड्रोन पथकातील हेड कॉन्स्टेबल संदीप जगताप, जालिंदर पाखरे, प्रमोद ढाकणे, सोहेल सय्यद आणि रियाज शेख यांनी सहभाग घेतला. याशिवाय आप्पासाहेब ढूस, पत्रकार शिवाजी घाडगे, चंद्रकांत कराळे आणि संतोष खाडे यांनीही मोहिमेत उपस्थिती दर्शविली. पुणे येथील विशेष पथकाने सोमया फार्म परिसरात सखोल शोधमोहीम राबवून संशयास्पद उड्डाणांवर बारकाईने लक्ष ठेवले. प्रशासनाच्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे नागरिकांमधील भीतीचे वातावरण कमी करण्यात यश आले आहे.

COMMENTS