Homeताज्या बातम्या

सहा महिन्यांपासून दहशत माजविणारा बिबट्या जेरबंदऔटेवाडी तलाव परिसरातील शेतकऱ्यांचा सुटकेचा निश्वास

श्रीगोंदा : शहरालगतच्या डी.वाय. १२ कालव्याशेजारील औटेवाडी तलाव परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून वावरत शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्म

भोंदूबाबाला 10 वर्षांची सक्त मजुरी
मोहटादेवी देवस्थानचा पदभार धर्मादाय उपायुक्तांकडे  
मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू : नगराध्यक्ष आव्हाड

श्रीगोंदा : शहरालगतच्या डी.वाय. १२ कालव्याशेजारील औटेवाडी तलाव परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून वावरत शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारा बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. मंगळवारी (दि. २ जून) पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. सकाळी ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच नगरसेविका अनिता औटी, हरिभाऊ औटी व अशोक औटी यांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरसेविका अनिता औटी यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली भगत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पहाटे साडेपाचच्या सुमारास वन विभागाच्या पथकाने बिबट्याला ताब्यात घेतले. यावेळी वनरक्षक नितीन डफडे तसेच वन कर्मचारी भाऊसाहेब जमदाडे व भारत लोखंडे उपस्थित होते.
स्थानिकांच्या माहितीनुसार, हा बिबट्या गेल्या सहा महिन्यांपासून औटेवाडी तलाव परिसरात नियमितपणे वावरत होता. शेतात ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकरी, शेतमजूर व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  
बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेऊन वन विभागाने महिनाभरापूर्वी तलाव परिसरात पिंजरा उभारला होता. मात्र पिंजऱ्यात आमिष ठेवले नसल्याने बिबट्या त्याकडे फिरकत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात होती. अखेर हरिभाऊ औटी यांच्यासह काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चातून पिंजऱ्यात शेळी ठेवली. त्यानंतरच बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने परिसरात याची चर्चा रंगली आहे.
मादी व दोन पिल्लांच्या वावरामुळे चिंता कायम
बिबट्या पकडला गेल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी या भागात अद्याप बिबट्याची मादी व दोन पिल्लांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे आणखी एक पिंजरा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक बनल्याने नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण कायम आहे.
भक्ष ठेवल्यानंतरच बिबट्या पिंजऱ्यात अडकला : भगत
“तलाव परिसरात वन विभागाने पिंजरा उभारला होता. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी भक्ष म्हणून शेळी ठेवल्यानंतरच बिबट्या पिंजऱ्यात अडकला. माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बिबट्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले. परिसरात बिबट्याची मादी व दोन पिल्लांचा वावर असल्याची माहिती मिळाली असून अतिरिक्त पिंजऱ्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या पिंजऱ्यांची उपलब्धता मर्यादित असली तरी शक्य तितक्या लवकर आणखी एक पिंजरा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष सावधगिरी बाळगावी,” असे वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली भगत यांनी सांगितले.

COMMENTS