बीड : केज तालुक्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल नऊ तास प्रतीक्षा करावी लागल्याच्या गंभीर घटनेची दखल

बीड : केज तालुक्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल नऊ तास प्रतीक्षा करावी लागल्याच्या गंभीर घटनेची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांनी संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली. मात्र, याच प्रकरणात केज पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बीड जिल्हाप्रमुख उल्हासभैय्या गिराम पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. गिराम पाटील यांनी म्हटले आहे की, अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलगी व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवण्यासाठी केज पोलीस ठाण्यात जावे लागले. तक्रार देण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला तब्बल २७ तास पोलीस ठाण्यात ताटकळत ठेवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.
पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत पीडित अल्पवयीन मुलीचा जबाब सुरक्षित वातावरणात व महिला अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेणे आवश्यक असतानाही त्या नियमांचे पालन झाले नसल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साळुंखे यांनी उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ कार्यमुक्त केले. त्याच धर्तीवर दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही उल्हासभैय्या गिराम पाटील यांनी दिला आहे.

COMMENTS