श्रीगोंदा : तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे रविवारी (दि. १ जून) गावातील विविध शासकीय, निमशासकीय व अन्य क्षेत्रांमध्ये प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिव

श्रीगोंदा : तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे रविवारी (दि. १ जून) गावातील विविध शासकीय, निमशासकीय व अन्य क्षेत्रांमध्ये प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या भूमिपुत्रांचा तसेच याच दिवशी वाढदिवस असलेल्या युवक व ग्रामस्थांचा विशेष सन्मान सोहळा पार पडला. रवींद्र चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कौतुकास्पद उपक्रमाचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
रवींद्र चव्हाण व भरत काकडे यांच्या मित्र मंडळाने गावातील ज्येष्ठांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी सेवानिवृत्त व्यक्तींनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग समाजहितासाठी करावा, असे आवाहन केले. तसेच, निवृत्तीनंतर प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी एक आंब्याचे झाड लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश दिला. याप्रसंगी सर्व सन्मानित मान्यवरांना स्मृतिचिन्हासह आंब्याचे रोप भेट देण्यात आले.
या सोहळ्याला सरपंच मनीषा नहाटा, उपसरपंच चित्रा पवार, पंचायत समितीचे माजी उपसभापती गणपतराव काकडे, संस्थेचे चेअरमन बाळासाहेब थोरात, नागवडे कारखान्याचे संचालक डी. आर. (आबा) काकडे, माजी चेअरमन लालासाहेब काकडे यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत निवृत्तांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. टी. शेलार यांनी केले, तर आभार रवींद्र चव्हाण यांनी मानले.

COMMENTS