पॅरिस : युरोपियन फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी 'चॅम्पियन्स लीग' स्पर्धा जिंकल्यानंतर पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) क्लबच्या चाहत्यांनी मोठ
पॅरिस : युरोपियन फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘चॅम्पियन्स लीग’ स्पर्धा जिंकल्यानंतर पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) क्लबच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. मात्र, या उत्साहाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. पोलीस आणि दंगेखोरांमध्ये झालेल्या चकमकीत २१९ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती फ्रान्सचे गृहमंत्री लॉरेंट न्युनेझ यांनी दिली.
‘पीएसजी’ने अंतिम सामन्यात विजय मिळवत या स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर हजारो चाहते पॅरिसच्या रस्त्यांवर उतरले. शहरातील अनेक भाग फटाके, धूरबाँब आणि घोषणांनी दणाणून गेले. काही ठिकाणी संतप्त जमावाने रस्त्यांवरील दुचाकी आणि इतर वाहनांची जाळपोळ करत दुकानांच्या काचाही फोडल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला. या कारवाईत ५७ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हिंसाचारप्रकरणी देशभरातून एकूण ७८० जणांना अटक करण्यात आली असून, ४५० हून अधिक संशयितांना कोठडीत ठेवण्यात आले आहे. यामध्ये एकट्या पॅरिसमध्ये अटक झालेल्यांची संख्या ४८० एवढी आहे.
रविवारी होणाऱ्या विजयी मिरवणुकीसाठी प्रशासनाने विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. आयफेल टॉवर परिसरात सुमारे सहा हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याप्रसंगी ‘पीएसजी’च्या फुटबॉलपटूंच्या सत्कारासाठी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहणार आहेत. बहुसंख्य चाहते शांततेत आनंद साजरा करतात, मात्र काही समाजकंटक केवळ गोंधळ घालण्यासाठी गर्दीत मिसळतात. त्यांच्यावर प्रशासन कठोर कारवाई करणार असल्याचे फ्रान्सचे गृहमंत्री लॉरेंट न्युनेझ यांनी स्पष्ट केले.

COMMENTS