राहाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त साईयोग फाउंडेशनच्या वतीने वृक्षसंवर्धन व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले

राहाता : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त साईयोग फाउंडेशनच्या वतीने वृक्षसंवर्धन व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. दहेगावच्या लोकनियुक्त सरपंच पूनमताई डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता येथील खटकळी परिसरातील सद्गतीघाट येथे हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
या प्रसंगी परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. तसेच सरपंच पूनमताई डांगे व महिला सदस्यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्येष्ठ सदस्य अनिल सातव यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या लोककल्याणकारी कारभारावर प्रकाश टाकला. अनेक संकटांचा सामना करत त्यांनी सलग तीन दशके जनहिताचे राज्य चालविले आणि देशातील असंख्य धार्मिक, सामाजिक व सार्वजनिक कामांमधून त्यांचे कार्य आजही जिवंत असल्याचे त्यांनी सांगितले.
सरपंच पूनमताई डांगे म्हणाल्या, ‘‘दुष्काळावर मात करण्यासाठी अहिल्यादेवींनी विहिरी, बारवा आणि घाटांची उभारणी केली. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाला चालना देत पर्यावरण संवर्धनाचा आदर्श त्यांनी निर्माण केला. जलसंधारण, बालविवाह प्रतिबंध आणि हुंडाबंदी यांसारख्या विषयांवर त्यांनी प्रभावी उपाययोजना राबविल्या. साईयोग फाउंडेशन त्यांच्याच विचारांना अभिप्रेत असे समाजोपयोगी कार्य करीत आहे.’’
या प्रसंगी साईयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे, सुष्मिताताई चव्हाण, नीलमताई चेणुके, गोरखनाथ दंडवते, भाऊसाहेब बनकर, अनिल कांदळकर, बबलू फटांगरे, विलास वाळेकर, मनोज पिपाडा, रंगनाथ सदाफळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS