नांदेड : महावितरणकडून ग्राहकांना चुकीची व अवाजवी वाढीव वीज बिले दिली जात असल्याचा गंभीर आरोप करत नांदेड येथील ग्राहक कार्यकर्ते हरीश बाबुभाई ठक्क

नांदेड : महावितरणकडून ग्राहकांना चुकीची व अवाजवी वाढीव वीज बिले दिली जात असल्याचा गंभीर आरोप करत नांदेड येथील ग्राहक कार्यकर्ते हरीश बाबुभाई ठक्कर यांनी महावितरण कंपनीकडे लेखी निवेदन सादर केले आहे. मीटर रीडिंग व बिलाच्या तारखांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती आढळून येत असल्याने सर्वसामान्य ग्राहक आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जात असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनानुसार, एका ग्राहकाला दि. २६ मे २०२६ रोजी वीज बिल प्राप्त झाले, मात्र या बिलावर देयक दिनांक १० मे २०२६ असा नमूद करण्यात आला होता. बिलामध्ये केवळ १६ दिवसांचा वापर दाखवण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, १९ मे २०२६ पर्यंत बिलाची रक्कम भरल्यास सवलत मिळणार असल्याचे बिलावर लिहिले होते. परंतु प्रत्यक्षात बिल ग्राहकाला २६ मे रोजी मिळाल्याने सवलतीचा लाभ घेण्याची संधीच ग्राहकाची हुकली.
हरीश ठक्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहक क्रमांक ५५००१००३२६६१ या खात्यावर तब्बल १५ हजार ९०० रुपयांचे बिल आकारण्यात आले आहे. याच ग्राहकाच्या दुसऱ्या बिलात १० हजार ९९० रुपयांची रक्कम दाखवण्यात आली असून दोन्ही बिलांची अंतिम तारीख ३० मे २०२६ ठेवण्यात आली आहे. सवलतीची मुदत संपल्यानंतर बिल वितरित करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मीटर रीडिंग योग्य पद्धतीने न घेता सरासरी बिल आकारले जात असल्याने ग्राहकांवर आर्थिक भार पडत आहे. वीज ग्राहकांना वेळेत बिले मिळणे, सवलतीच्या तारखा स्पष्ट असणे आणि चुकीची आकारणी तात्काळ दुरुस्त करणे आवश्यक आहे; अन्यथा ग्राहकांच्या वतीने व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

COMMENTS