मुंबई : राज्यातील पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे शालेय बसचालक व मालक आर्थिक अडचणीत सापडले असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर होतान

मुंबई : राज्यातील पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमुळे शालेय बसचालक व मालक आर्थिक अडचणीत सापडले असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या वाहतुकीवर होताना दिसत आहे. वाढत्या इंधन खर्चामुळे शाळा आठवड्यातून केवळ तीन दिवस प्रत्यक्ष भरवून उर्वरित दोन दिवस ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेण्याची मागणी राज्यातील शालेय बस संघटनांनी सरकारकडे केली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात पुन्हा एकदा ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय चर्चेत आला आहे.
उन्हाळी सुट्टीनंतर जून महिन्यात शाळा सुरू होणार असताना वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. बस मालकांच्या मते, सतत वाढणाऱ्या इंधन दरांमुळे जुन्या शुल्कात बससेवा चालवणे अशक्य होत आहे. शाळा दोन सत्रांऐवजी एकाच सत्रात भरवून विद्यार्थ्यांची ये-जा कमी करावी, अशी त्यांची भूमिका आहे. तसेच आठवड्यातून तीन दिवस प्रत्यक्ष शिक्षण आणि दोन दिवस ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. राज्यातील शालेय बस व कंपनी बस मालक संघटनांनी सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच १ जूनपर्यंत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, तसेच इंधन दरवाढीमुळे अडचणीत आलेल्या या क्षेत्राला अनुदान किंवा विशेष सवलत जाहीर करावी, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे.
यासोबतच बसभाड्यात वाढ करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम विदर्भातही जाणवू लागला आहे. नागपूरमधील शालेय बस आणि व्हॅन चालक संघटनांनी सेवा शुल्कात १० ते १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकांच्या आर्थिक भारात वाढ होणार आहे. आतापर्यंत दरमहा १ हजार रुपये भाडे देणाऱ्या पालकांना अधिक रक्कम मोजावी लागणार असून, २ हजार रुपये शुल्क असलेल्या सेवांचे दरही वाढणार आहेत. त्यामुळे शिक्षणासोबतच वाहतुकीचा खर्चही कुटुंबांच्या चिंतेचा विषय ठरत आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांत उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. अनेक ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार शाळा सुरू होण्याच्या तारखेबाबत पुनर्विचार करत असल्याचे संकेत मिळत आहेत. उष्णतेची परिस्थिती कायम राहिल्यास शाळा १५ जूनऐवजी २६ जूनपासून सुरू करण्याबाबत विचार सुरू असल्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले आहे.
चारवेळा इंधन दरवाढ; डिझेल मिळेना गेल्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चार वेळा वाढ झाली आहे. सोमवारी झालेल्या ताज्या दरवाढीत पेट्रोल प्रति लीटर २ रुपये ६१ पैसे, तर डिझेल २ रुपये १७ पैशांनी महागले. १५ मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात एकूण ७ रुपये ३८ पैसे, तर डिझेलच्या दरात ७ रुपये ९ पैशांची वाढ झाली आहे. मात्र दरवाढ होऊनही डिझेल मिळण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत.

COMMENTS