पुणे : वारकरी संप्रदायाविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास

पुणे : वारकरी संप्रदायाविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्या जामीन अर्जाला पुणे पोलिसांनी न्यायालयात तीव्र विरोध दर्शविला आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या वक्तव्यांची पुनरावृत्ती झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका पोलिसांनी न्यायालयासमोर मांडली.
वाघोली पोलिसांनी विकास सदाशिव लवांडे (वय ५१, रा. शिंदेवाडी, हवेली) यांना काही दिवसांपूर्वी अटक केली होती. समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) वारकरी संप्रदायातील संत, महंत, कीर्तनकार आणि धार्मिक व्यक्तींविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी येरवडा येथील नलिनी आशिष वायदंडे यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. दोन गटांमध्ये वैमनस्य निर्माण करणे, धार्मिक भावना दुखावणे आणि समाजातील सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले आहेत.
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर विकास लवांडे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या वतीने अधिवक्ता मिलिंद पवार यांनी बाजू मांडली. मात्र, तपास अद्याप सुरू असल्याने आणि साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया बाकी असल्याने जामीन देऊ नये, अशी मागणी पोलिसांनी केली.
तपास यंत्रणेने न्यायालयात सांगितले की, आरोपीला जामीन मंजूर झाल्यास तक्रारदार किंवा साक्षीदारांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे. तसेच आषाढी एकादशी आणि वारी सोहळ्याच्या संवेदनशील वातावरणात पुन्हा वादग्रस्त वक्तव्य झाल्यास सामाजिक तणाव निर्माण होऊ शकतो. वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. त्यामुळे धार्मिक वातावरण आणि सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी खबरदारीची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आरोपीवर कठोर कायदेशीर अटी घालाव्यात, अशी विनंतीही करण्यात आली.

COMMENTS