बीड : ह.भ.प. समाधान महाराज शर्मा व ह.भ.प. संतोष महाराज शर्मा यांच्या मातोश्री तथा सौ. शोभा सुनील दायमा यांच्या मातोश्री सरजुबाई मोहनलालजी श


बीड : ह.भ.प. समाधान महाराज शर्मा व ह.भ.प. संतोष महाराज शर्मा यांच्या मातोश्री तथा सौ. शोभा सुनील दायमा यांच्या मातोश्री सरजुबाई मोहनलालजी शर्मा (सुंटवाल), केज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बीड येथील आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. 23 मे 2026 ते दि. 15 जून 2026 या कालावधीत होणार असून नागरिकांना विविध वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, मधुमेह रुग्णांसाठी रक्त व लघवी तपासणी तसेच सामान्य रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे. सरजुबाई शर्मा यांनी 100 वर्षे पूर्ण करून 101 व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. सकल जैन समाज, बीड यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून शहरातील जैन समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आयोजन पूर्ण होत आहे. ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी महाराष्ट्रभर संतपरंपरा व समाजप्रबोधनाचे कार्य करत बीड जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांच्या मातोश्रींच्या शतकपूर्ती निमित्त हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे. दरम्यान, बीड शहरातील बंब नगरी, सावता माळी चौक येथे दि. 18 मे ते 25 मे दरम्यान अतिरुद्र महायज्ञ व शिव महापुराण कथा सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. या धार्मिक वातावरणात सर्वसामान्य नागरिकांसाठी वैद्यकीय सेवेचा उपक्रम राबविणे हे स्तुत्य असल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेषतः नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने डोळ्यांना त्रास असलेल्या किंवा चष्मा वापरणार्या विद्यार्थ्यांनी नेत्र तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सकल जैन समाजाने केले आहे. नेत्र तपासणी : सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत, मधुमेह तपासणी : सकाळी 7 ते सायं. 7 वाजेपर्यंत, सामान्य रुग्ण तपासणी : सकाळी 10 ते सायं. 8 वाजेपर्यंत शहर व पंचक्रोशीतील नागरिकांनी या मोफत वैद्यकीय शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS