मे महिन्याच्या अखेरीस नांदेड जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट अधिकच वाढली असून शहरातील कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचले आहे. प्रखर उन्हाम

मे महिन्याच्या अखेरीस नांदेड जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट अधिकच वाढली असून शहरातील कमाल तापमान 43 अंश सेल्सिअसच्या पुढे पोहोचले आहे. प्रखर उन्हामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून दुपारी 12 ते 4 या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते अक्षरशः ओस पडत आहेत. बाजारपेठा, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी नेहमीची गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सूर्याची तीव्रता वाढल्याने उकाडा आणि गरम वार्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, हृदयविकार, मधुमेह व रक्तदाबाच्या रुग्णांना या वाढत्या तापमानाचा मोठा त्रास होत आहे. अनेक नागरिकांना अंगाची आग होणे, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये उष्माघातासंदर्भातील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे नागरिक टाळत असून अनेक व्यावसायिकांनीही दुपारच्या वेळेत दुकानांमध्ये कमी ग्राहक येत असल्याचे सांगितले. शहरातील चहाचे स्टॉल, ज्यूस सेंटर, ऊसाच्या रसाच्या गाड्या आणि थंड पेय विक्रेत्यांकडे मात्र गर्दी वाढली आहे. ग्रामीण भागातही शेतमजूर आणि बांधकाम कामगारांना कडक उन्हाचा फटका बसत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना भरपूर पाणी पिणे, डोक्यावर टोपी किंवा कापड वापरणे, हलका आहार घेणे आणि दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

COMMENTS