पीकेची रणनीती अंतिमतः भाजपेतर पक्षांना संपविणारी!

Homeदखल

पीकेची रणनीती अंतिमतः भाजपेतर पक्षांना संपविणारी!

      महाराष्ट्रात पीके अर्थात प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांची रणनीती यापूर्वी सांभाळली असली तरी, भाजपेतर पक्षांना राजकीय विजय त्यांनी मिळवून द

पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा सदस्य म्हणून शपथ; पेहराव आणि व्यक्तिमत्त्वाची छाप ठरली चर्चेचा विषय
बिनविरोधाचा आग्रह पारदर्शक नसतो!
महायुतीतील अस्वस्थता!

      महाराष्ट्रात पीके अर्थात प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांची रणनीती यापूर्वी सांभाळली असली तरी, भाजपेतर पक्षांना राजकीय विजय त्यांनी मिळवून दिले असले तरी अंतिमतः त्या पक्षांचे अस्तित्व खिळखिळे करणारीच असते.महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन गोष्टी सर्वाधिक चर्चेत आहेत, सत्ता आणि रणनीती. सत्ता टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि विरोधकांना गाफील ठेवण्यासाठी राजकीय पक्ष आता केवळ कार्यकर्त्यांवर किंवा पारंपरिक संघटनांवर अवलंबून राहत नाहीत; तर डेटा, सर्वेक्षण, सोशल मीडिया आणि मायक्रो मॅनेजमेंट करणाऱ्या ‘पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट’वर भर देत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि प्रशांत किशोर यांची वाढती जवळीक हा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा संकेत मानला जातो. १९ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात झालेली बैठक ही केवळ औपचारिक चर्चा नव्हती; ती आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आखली जाणारी मोठी राजकीय पुनर्बांधणी असल्याचे संकेत आहेत. चर्चेनंतर समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे रणनीतीकार म्हणून काम पाहू शकतात. आणि इथेच प्रश्न निर्माण होतो की, ही नियुक्ती पक्षासाठी संजीवनी ठरणार की आणखी एक राजकीय प्रयोग?अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळी वाट धरली, सत्ता मिळवली, मंत्रीपदे मिळवली; पण जनाधार मिळवण्यात अजूनही त्यांच्या पक्षाला पूर्ण यश आलेले नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आजही “खरी राष्ट्रवादी” कोणाची, या प्रश्नाचे उत्तर मोठ्या प्रमाणावर शरद पवारांच्या बाजूने झुकते. अजित पवार गटाकडे सत्ता आहे, प्रशासन आहे, संसाधने आहेत; पण भावनिक नाळ आणि कार्यकर्त्यांचा नैसर्गिक ओढा अजूनही मर्यादित आहे. याच कारणामुळे आता त्यांना फक्त राजकारण नव्हे तर ‘राजकीय इमेज मॅनेजमेंट’ची गरज निर्माण झाली आहे. इथेच प्रशांत किशोर यांचे नाव पुढे येते.भारतीय राजकारणात गेल्या दशकात जर कुणी निवडणूक रणनीती या संकल्पनेला उद्योगाचे स्वरूप दिले असेल, तर ते प्रशांत किशोर. नरेंद्र मोदींच्या २०१४ च्या प्रचारापासून त्यांची राष्ट्रीय ओळख निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी नितीश कुमार, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, अरविंद केजरीवाल, स्टॅलिन यांसारख्या नेत्यांसोबत काम केले. डेटा-आधारित निवडणूक नियोजन, बूथ स्तरावरील मायक्रो मॅनेजमेंट, सोशल मीडिया कथानक तयार करणे, विरोधकांविरोधात आक्रमक धारणा उभी करणे, नेतृत्वाची प्रतिमा कृत्रिमरीत्या मजबूत करणे पण याचबरोबर एक दुसरी बाजूही आहे. प्रशांत किशोर यांच्यासोबत काम करणाऱ्या अनेक पक्षांना निवडणूक जिंकता आली, पण दीर्घकालीन संघटनात्मक मजबुती मिळालीच असे नाही. राजकीय वर्तुळात एक चर्चा सातत्याने होते की, भाजपविरोधी पक्षांसाठी प्रशांत किशोर निवडणूक जिंकून देतात, पण त्या पक्षांचे वैचारिक किंवा संघटनात्मक अस्तित्व कमकुवत होत जाते. यासाठी आपण काही उदाहरणे पाहिली तर असे दिसते की, काँग्रेसने अनेक राज्यांत त्यांची मदत घेतली, पण पक्षाची संघटनात्मक घसरण थांबली नाही.पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांना विजय मिळाला, पण नंतर काँग्रेस तुटली. तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये जिंकली, पण पक्षात केंद्रीकरण वाढले. बिहारमध्ये स्वतः प्रशांत किशोरांनी “जनसुराज” सुरू केला; पण जनतेने त्यांना अद्याप ठोस पर्याय मानलेले नाही. यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, रणनीती निवडणूक जिंकवू शकते, पण ती विचारसरणी, निष्ठा आणि कार्यकर्त्यांची ऊर्जा निर्माण करू शकत नाही.प्रशांत किशोर बिहार, बंगाल किंवा दिल्लीत यशस्वी झाले म्हणून महाराष्ट्रातही तोच फॉर्म्युला चालेल, असे नाही. महाराष्ट्राचे राजकारण सहकारी संस्था, स्थानिक नेते, जातीय समीकरणे, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि भावनिक नात्यांवर चालते. इथे केवळ सोशल मीडिया मोहिमेने निवडणुका जिंकत नाहीत. इथे कार्यकर्त्याची नाळ महत्वाची असते. इथे लोकांना नेता “आपला” वाटला पाहिजे. अजित पवार गटाची सर्वात मोठी समस्या हीच आहे, ते सत्तेत प्रभावी दिसतात; पण जनमानसात भावनिकरित्या अजूनही स्वीकारले गेले नाहीत.राजकीय विश्लेषकांच्या मते, प्रशांत किशोर हे बहुतेक वेळा अप्रत्यक्षपणे भाजपच्या व्यापक राजकीय गणितात बसणाऱ्या पक्षांसोबत काम करतात. त्यामुळे राष्ट्रवादी (अजित गट) आणि पीके यांची जवळीक ही फक्त निवडणूक रणनीती नसून, महाराष्ट्रातील आगामी सत्तासमीकरणांचा भाग असू शकते. प्रशांत किशोरांची नियुक्ती ही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यासाठी मोठी राजकीय गुंतवणूक ठरू शकते. पण निवडणूक रणनीती हा फक्त बाह्य मेकअप असतो. पक्षाला जिवंत ठेवते ती विचारसरणी, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि जनतेचा विश्वास. महाराष्ट्राच्या राजकारणात हा प्रश्नच अखेरीस सर्व रणनीतींवर भारी पडू शकतो.

COMMENTS