नवी दिल्ली : नीट-युजी (NEET-UG) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशातील राजकारण चांगलेच तापले असून, काँग्रेस नेते खा. राहुल गांधी

नवी दिल्ली : नीट-युजी (NEET-UG) परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशातील राजकारण चांगलेच तापले असून, काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
खा. राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवरील (Social Media) पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, सलग दोन वर्षे नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रकार समोर आले, मात्र तरीही शिक्षण व्यवस्थेत कोणताही ठोस बदल दिसून आलेला नाही. तपास यंत्रणा आणि समित्या नेमूनही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरूच असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी नमूद केले की, २०२४ मधील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात परीक्षा रद्द करण्यात आली नव्हती, तर तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आया होता. मात्र, २०२६ मध्ये परिस्थिती अधिक गंभीर बनल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या पार्श्वभूमीवर वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांबद्दल सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी सातत्याने समोर येत असताना शिक्षणमंत्र्यांवर कोणतीही कारवाई का होत नाही? विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि पालकांच्या विश्वासाचा प्रश्न असताना सरकार मौन का बाळगत आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. नीट-युजी २०२६ परीक्षा ३ मे रोजी पार पडली होती. परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप झाल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) परीक्षा रद्द केली. त्यानंतर केंद्र सरकारने तपास सीबीआयकडे सोपवला आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेकडून अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून, प्रश्नपत्रिका गळती, उमेदवारांकडून पैशांची मागणी तसेच विशेष मार्गदर्शनाच्या नावाखाली प्रश्न उपलब्ध करून देण्याच्या आरोपांची चौकशी सुरू आहे.

COMMENTS