जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील रहिवासी रोहित उर्फ बबलू गोलेकर याच्याविरुद्ध खंडणीसह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खर्डा पोलिस ठाण्यात गुन्ह

जामखेड : तालुक्यातील खर्डा येथील रहिवासी रोहित उर्फ बबलू गोलेकर याच्याविरुद्ध खंडणीसह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी याबाबत फिर्याद दिली असून या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ मे रोजी विजयसिंह गोलेकर हे खर्डा येथे असताना रोहित उर्फ बबलू गोलेकर याने दूरध्वनीवरील संदेशवहन माध्यमातून संपर्क साधला. “तुझ्यामुळे माझे मोठे नुकसान झाले आहे. माझा २० लाख रुपयांचा खर्च झाला असून लग्नही मोडले आहे. तुला जिवंत राहायचे असेल तर २० लाख रुपये दे, अन्यथा गोळ्या घालून ठार मारीन,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर संबंधिताने शिवीगाळ व दमदाटी करत पुन्हा धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्याच रात्री उशिरापर्यंत अनेक वेळा दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच संदेश पाठवून बोलण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी खर्डा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
रोहित उर्फ बबलू गोलेकर याच्याविरुद्ध खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. तसेच पुणे येथील वारजे पोलिस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद असल्याचे सांगण्यात आले.

COMMENTS