Homeताज्या बातम्याविदेश

इराणचे सौदीतील तेल प्रकल्पावर प्रतिहल्ले

जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण प्रकल्प अरामकोवर हल्लातेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर मध्यपूर्वेतील संघर्ष

इंधन टंचाईच्या अर्थव्यवस्थेला हादरे !
दूरच्या युद्धाचे स्वयंपाकघरावर सावट !
इराणमधील भारतीयांनी तात्काळ देश सोडावा

जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण प्रकल्प अरामकोवर हल्ला
तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर मध्यपूर्वेतील संघर्ष अधिकच तीव्र झाला असून प्रादेशिक तणाव निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. इराणने मागील चोवीस तासांत अमेरिकेच्या लष्करी तळांवर विविध देशांत हल्ले केल्याचा दावा केला आहे. अमेरिका आणि इस्रायल युद्ध शमवण्याचे संकेत देत असले तरी इराणने प्रतिहल्ल्यांची भूमिका कायम ठेवत कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटींस नकार दिला आहे.
इराणने सौदी अरेबियातील महत्त्वाच्या तेल शुद्धीकरण केंद्रावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सौदी अरेबियातील रास तनुरा येथील शुद्धीकरण प्रकल्प, जो सरकारी मालकीच्या सौदी अरामको कंपनीच्या अखत्यारीत आहे, त्यावर निशाणा साधण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर संबंधित प्रकल्प तात्पुरता बंद करण्यात आल्याचे सांगितले जाते. या कारवाईमुळे जागतिक तेलबाजारात अस्थिरतेची चिन्हे दिसू लागली आहेत. इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारिजानी यांनी सामाजिक माध्यमांद्वारे स्पष्ट केले की, अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा किंवा करार होणार नाही. देश आपल्या धोरणांवर ठाम राहील, असा इशाराही त्यांनी दिला. अमेरिकेसोबत संवाद सुरू होण्याच्या शक्यतेबाबत पसरलेल्या चर्चांना त्यांनी यानिमित्ताने फेटाळले. या संघर्षाची व्याप्ती वाढत असून इराणकडून इस्रायलसह कतार, बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीतील काही ठिकाणांवरही हल्ले झाल्याचे सांगितले जाते. लेबनॉनमधील हिजबुल्लाह या संघटनेनेही या संघर्षात सहभाग घेतल्याचा दावा केला आहे. त्यांनी इस्रायलमधील काही भागांवर स्फोटक हल्ले केल्याचे वृत्त आहे. खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची भूमिका या गटाने जाहीर केल्याचे सांगितले जाते. या वाढत्या लष्करी कारवायांचा परिणाम जागतिक हवाई वाहतुकीवरही झाला आहे. अनेक देशांतील उड्डाणे रद्द करण्यात आली असून हजारो प्रवासी विविध विमानतळांवर अडकून पडले आहेत. मध्यपूर्वेतील प्रमुख विमानतळ काही काळासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. जगातील अत्यंत वर्दळीच्या विमानतळांपैकी एक मानले जाणारे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सलग काही दिवस बंद असल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. विमान कंपन्यांच्या समभागांवरही या घडामोडींचा परिणाम दिसून येत आहे.


भारतात 2 दिवसांत 760 पेक्षाही अधिक उड्डाणे रद्द
इस्रायल-इराण युद्धामुळे गेल्या दोन दिवसांत भारतात 760 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. सोमवारी दिल्ली विमानतळावर 87 विमानांची उड्डाणे रद्द झाली. दिल्ली, मुंबई, कोची, बेंगळूरु, चेन्नई, जयपूर, अहमदाबाद यांसारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले आहेत.

संवादातून तोडगा काढण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका स्पष्ट करत पश्‍चिम आशियातील परिस्थिती गंभीर चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, जगभर तणावाचे वातावरण आहे. भारत शांतता आणि स्थैर्याचा समर्थक असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. भारत सर्व देशांसोबत मिळून काम करेल. या संकटाचा तोडगा संवाद आणि राजनैतिक मार्गानेच निघावा, यासाठी भारताचा आग्रह आहे. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, पश्‍चिम आशियातील सध्याची परिस्थिती आमच्यासाठी गंभीर चिंतेची बाब आहे. भारत सर्व वाद संवाद आणि कूटनीतीच्या माध्यमातून सोडवण्याचे समर्थन करतो. या प्रदेशातील भारतीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही संबंधित सर्व देशांसोबत समन्वय ठेवून काम करत राहू.

कारवाई काही आठवडे चालू राहण्याचे ट्रम्प यांचे संकेत
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी कारवाई काही आठवडे चालू राहू शकते, असे संकेत दिले आहे. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवाईत इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केल्याचे सांगितले जाते. सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले झाल्याने जीवितहानीही झाली आहे. शैक्षणिक संस्थांवर झालेल्या हल्ल्यांमुळे निरपराध नागरिकांचे बळी गेल्याच्या बातम्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS