पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील एका फर्निचर मॉलवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरू

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील एका फर्निचर मॉलवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी मॉलच्या दिशेने गोळ्या झाडून परिसरात दहशत निर्माण केली. हा गोळीबार लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शूटरकडून करण्यात आला असून, गोळीबारानंतर धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील प्रसिद्ध फर्निचर मॉलसमोर आलेल्या दोन तरुणांनी अचानक पिस्तुलमधून गोळीबार सुरू केला. यामध्ये मॉलच्या फलकासह काचेचे नुकसान झाले असून घटनास्थळी काही काडतुसे आढळून आली आहेत. गोळीबारानंतर आरोपी तातडीने पसार झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखेचे पथक आणि न्यायवैद्यक तज्ज्ञ (फॉरेन्सिक टीम) घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेण्यात आले असून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात येत आहे. संबंधित पोस्टमध्ये मॉलच्या मालकाला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. पोलिसांकडून या पोस्टची सत्यता आणि त्यामागील व्यक्तींची चौकशी सुरू आहे. याचबरोबर आणखी एक ऑडिओ क्लिपही समोर आली असून, त्यामध्ये स्वतःला एका कुख्यात गुन्हेगारी टोळीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये धमकीवजा इशारे देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पोलीस उपायुक्त गणेश इंगळे यांनी सांगितले की, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

COMMENTS