गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातमधील सोमनाथ मंदिर येथे प्राणप्रतिष्ठेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्र

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी गुजरातमधील सोमनाथ मंदिर येथे प्राणप्रतिष्ठेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला. या वेळी त्यांनी 11 मे 1998 रोजी झालेल्या पोखरण अणुचाचणीची आठवण करून देत भारताच्या सामर्थ्य, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव केला.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आजचा दिवस देशासाठी ऐतिहासिक आहे. कारण याच दिवशी भारताने पोखरण येथे अणुचाचणी करून जगाला आपली ताकद दाखवून दिली होती. त्या काळात भारतावर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. अनेक शक्तिशाली देश भारताला रोखण्यासाठी पुढे आले होते. आर्थिक निर्बंधांपासून राजनैतिक दबावापर्यंत अनेक अडथळे निर्माण करण्यात आले. मात्र, भारताने कोणतीही भीती न बाळगता ठाम भूमिका घेतली आणि राष्ट्रीय स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. ते पुढे म्हणाले की, भारताची ताकद केवळ शस्त्रांमध्ये नाही, तर त्याच्या संस्कृतीत, श्रद्धेत आणि विचारांत आहे. इतिहासात अनेक आक्रमकांनी सोमनाथ मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मंदिराची रचना वारंवार पाडण्यात आली, मात्र प्रत्येक वेळी ते पुन्हा उभे राहिले. कारण भारताची आध्यात्मिक आणि वैचारिक शक्ती अमर आहे. ज्याच्या नावात सोम आहे, त्याला कोण नष्ट करू शकेल? असे सांगत त्यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनरुत्थानाचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी मोदी यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा संकल्प केला होता. त्यावेळी अनेक अडचणी आणि विरोध निर्माण झाला, तरीही सरदार पटेल आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांच्या इच्छाशक्तीमुळेच मंदिराची पुनर्बांधणी शक्य झाली आणि देशाने शतकानुशतके सहन केलेल्या जखमांवर मात केली. देशातील सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर काम झाल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. काशी विश्वनाथ धाम, केदारनाथ, ओंकारेश्वर आणि अयोध्येतील राममंदिर यांसारख्या तीर्थक्षेत्रांचा विकास झाल्यामुळे देशाच्या सांस्कृतिक अस्मितेला नवे बळ मिळाले आहे. हजारो वर्षांपासून भारताची ओळख असलेल्या तीर्थक्षेत्रांचे महत्त्व अनेक दशकांपर्यंत दुर्लक्षित राहिले, मात्र आता देश पुन्हा आपल्या परंपरेशी जोडला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोमनाथ मंदिर भारताच्या आत्मविश्वासाचे प्रतीक
सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या 75 वर्षांच्या प्रवासाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, हे मंदिर केवळ श्रद्धेचे प्रतीक नसून भारताच्या पुनर्जागरणाचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. देशाने आता या सांस्कृतिक चेतनेला आणखी उंचीवर नेण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

COMMENTS