Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुखेड वनविभागातील गैरप्रकारांवर काँग्रेस आक्रमक; वनपरिक्षेत्र अधिकार्‍याच्या निलंबनाची मागणी

नांदेड : मुखेड वनपरिक्षेत्रातील कथित भ्रष्टाचार, अवैध वृक्षतोड आणि नागरिकांना दिल्या जाणार्‍या धमक्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाने आक्रमक भ

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात 12 मे रोजी पेन्शन अदालत
महापौर कार्यालयातून ‘अनधिकृत सत्ता’ चालतेय का? संतोष मुळे यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे मनपा प्रशासनात खळबळ
नांदेड शहरात अवैध बॅनर कोसळल्यामुळे युवक जखमी; जखमी युवकाचा महापालिकेला सवाल
Forest Department in Mukhed - Forestry Services Nanded near me - Justdial

नांदेड : मुखेड वनपरिक्षेत्रातील कथित भ्रष्टाचार, अवैध वृक्षतोड आणि नागरिकांना दिल्या जाणार्‍या धमक्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, वनपरिक्षेत्र अधिकारी उल्हास चव्हाण यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसचे शिष्टमंडळ लवकरच नांदेड येथील उपवनसंरक्षक कार्यालयात जाऊन निवेदन सादर करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांनी दिली.
मुखेड तालुक्यातील वनक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. स्थानिक व्यापारी आणि काही प्रभावशाली घटकांना हाताशी धरून शेकडो झाडांची कत्तल करण्यात येत असून, मोठ्या प्रमाणात लाकडाची अवैधरित्या विक्री होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकाराकडे वनविभागातील संबंधित अधिकार्‍यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यासंदर्भात यापूर्वी 28 एप्रिल 2026 रोजीही तक्रार स्वरूपात निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही कोणतीही चौकशी अथवा कारवाई न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे काँग्रेस पदाधिकार्‍यांनी सांगितले. तक्रार करणार्‍या नागरिकांना, पत्रकारांना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी उल्हास चव्हाण यांना राजकीय संरक्षण मिळत असल्यानेच त्यांच्या विरोधातील तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. वनजमिनीवरील अतिक्रमणाच्या घटनांनाही अप्रत्यक्ष पाठबळ दिले जात असल्याने वनसंपदेचे मोठे नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला. मुखेड वनविभागाच्या कारभाराची सखोल खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, दोषी आढळल्यास संबंधित अधिकार्‍याचे तात्काळ निलंबन करण्यात यावे आणि त्या ठिकाणी प्रामाणिक व सक्षम अधिकार्‍याची नियुक्ती करावी, अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे मुखेड तालुक्यातील वनव्यवस्थापन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, उपवनसंरक्षक कार्यालय या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS