Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

लोणी पुलावर मध्यरात्री अपघात ; दोन तरुणांचा मृत्यूदोघे गंभीर जखमी, निकृष्ट रस्त्यांमुळे वाढताहेत अपघात; नागरिकांकडून संताप

अर्धापूर : अर्धापूर-तामसा मार्गावरील लोणी गावाजवळील पुलावर गुरुवारी (दि. 7 मे) रात्री सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर जोरदा

घरात भरधाव डंपर घुसलाविवाहिता गंभीर; राहुरीतील घटना; घराचे मोठे नुकसान
बिलोलीत भरधाव हायवांचा कहर; तिघांचा बळी गेल्यानंतरही प्रशासन सुस्तमहसूल, पोलीस आणि आरटीओच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त; अवजड वाहनांमुळे शहरातील रस्ते ‘मृत्यूचा सापळा’
भिवंडीतील परसनाथ कंपाऊंडमधील कपड्यांच्या गोदामात भीषण आग; अग्निशमन दलाकडून रात्रभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात, सुदैवाने जीवितहानी नाही


अर्धापूर : अर्धापूर-तामसा मार्गावरील लोणी गावाजवळील पुलावर गुरुवारी (दि. 7 मे) रात्री सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून लोणी व तामसा परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजिंक्य देविदास चाटसे (वय 25, रा. लोणी ता. अर्धापूर) हा आपल्या मित्राच्या लग्नसमारंभातून तामसा येथून दुचाकीने घरी परतत होता. त्याचवेळी अभिषेक विश्‍वांभर नागठाणे (वय 25, रा. तामसा ता. हदगाव) हा अर्धापूरहून तामसाकडे जात होता. लोणी गावाच्या पाटीजवळील पुलावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र गंभीर दुखापतीमुळे अजिंक्य चाटसे आणि अभिषेक नागठाणे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या अकाली निधनामुळे नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातातील अन्य दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच नरेंद्राचार्य संस्थानचे रुग्णवाहिका चालक राजू पाचंगे, 108 रुग्णवाहिकेचे डॉ. आनंद शिंदे तसेच चालक मारोती गिरी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, अर्धापूर-तामसा मार्गावरील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप प्रवासी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रस्ता खड्डेमय, उंच-सखल आणि ओबडधोबड झाल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या मार्गावर अपघात होण्याचा धोका अधिक वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या मार्गावरील वाढते अपघात लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

COMMENTS