Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पूर गेला,पुराबरोबर आश्वासनं वाहून गेली; हिवर्याची जलजीवन विहीर आठ महिने गाळातच!

कडा : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तालुक्यासह राज्यभर आलेल्या पूरपरिस्थितीने अक्षरशः हाहाकार माजवला होता. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असताना शेतजमिनीत

पोहण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; आष्टी तालुक्यातील हृदयद्रावक घटना
आष्टी बसस्थानकाची दुरवस्था; प्रवाशांचे हाल कायम, काम 8 वर्षांपासून रखडले
महावीर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

कडा : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात तालुक्यासह राज्यभर आलेल्या पूरपरिस्थितीने अक्षरशः हाहाकार माजवला होता. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असताना शेतजमिनीतील सुपीक माती वाहून गेली,तर अनेक विहिरी माती, दगड-गोट्यांनी गाडल्या गेल्या. या अस्मानी संकटानंतर शासनाने मदतीच्या घोषणा केल्या; मात्र प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या खात्यावर अद्याप दमडीही जमा झालेली नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
आष्टी तालुक्यातील हिवरा येथील जलजीवन योजनेअंतर्गत असलेली विहीर उंदरखेल तलावालगत नदीकाठी असल्याने पूराच्या पाण्याने पूर्णतः गाळाने भरून बुजली आहे. विहिरीतील लोखंडी पाईप,रॅम्प आणि तीन मोटारीही गाळाखाली दडपल्या गेल्या आहेत. पूर ओसरल्यानंतर पाणीपुरवठा विभागाने पाहणी,सर्व्हे,पंचनामा व खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले;परंतु तब्बल आठ महिने उलटूनही प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली नाही. दरम्यान, गावाशेजारील दुसरी विहीर मार्च महिन्यातच कोरडी पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना वयोवृद्धांसह मोठा त्रास सहन करावा लागत आहे.एकीकडे शासन लाखो रुपये खर्चून जलजीवनसारख्या योजना राबवत असताना दुसरीकडे अधिकार्‍यांच्या दिरंगाईमुळे या योजना कागदावरच राहिल्याची भावना ग्रामस्थांमध्ये तीव्र होत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला असताना संबंधित विभाग जागा होऊन विहिरीची तातडीने दुरुस्ती करणार का,आणि पाणीपुरवठा पूर्ववत करणार का,?असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.ग्रामस्थ सध्या प्रशासनाच्या कृतीची आतुरतेने वाट पाहत आहेत.
वारंवार पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा विभाग ‘झोपेत’
जलजीवन योजनेअंतर्गत विहीर दुरुस्तीचा प्रश्न मागील आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. आम्ही वारंवार पाठपुरावा करूनही पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कोणतीही ठोस कार्यवाही करत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. विहीर गाळाने पूर्णतः बुजलेली असताना आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाही अधिकार्‍यांची उदासीनता कायम दिसून येत आहे. तातडीने काम सुरू करून पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
जबाबदारी झटकली; अधिकार्‍यांची ‘हात झटक’ भूमिका…
याबाबत पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीमाझी बदली झाली असून, माझ्या जागी आलेल्या सदगीर साहेबांशी संपर्क साधा,” असे सांगत जबाबदारी झटकल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांचा संताप आणखी वाढला असून,संबंधित अधिकार्‍यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची टीका ग्रामस्थांकडून केली जात आहे.

COMMENTS