नांदेड : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला वाघी रोड परिसरात सोमवारी अचानक हिंसक वळण लागल्याने संपूर्ण कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अ

नांदेड : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला वाघी रोड परिसरात सोमवारी अचानक हिंसक वळण लागल्याने संपूर्ण कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अतिक्रमणे हटविताना संतप्त जमावाने महापालिकेच्या जेसीबी चालकावर हल्ला करत बेदम मारहाण केली. या घटनेमुळे मोहिमेतील नियोजनाचा अभाव आणि महापालिका-पोलीस यंत्रणांमधील समन्वयातील तफावत उघड झाली आहे.
खडकपुरा-वाघी मार्गावर सुरू असलेल्या कारवाईदरम्यान घडलेल्या या घटनेत जेसीबी चालक मालू कांबळे गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जमावाने अचानक आक्रमक होत चालकाला वाहनातून खाली ओढून मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. या संपूर्ण घटनेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पोलिसांचा अपुरा बंदोबस्त. वजीराबाद पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए. एन. घोडके यांनी या मोहिमेबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती, असा स्पष्ट खुलासा केल्याने प्रशासनातील समन्वयाचा अभाव ठळकपणे समोर आला आहे. महापालिकेकडून पोलिसांना ना लेखी कळविण्यात आले, ना अतिरिक्त बंदोबस्ताची मागणी करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली. यामुळेच ही कारवाई पोलिसांच्या पूर्ण तयारीशिवाय राबविण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. काही ठिकाणी पोलिस उपस्थित असतानाही जमावाचा रोष नियंत्रणात आणण्यात अपयश आले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परिणामी, परिस्थिती झपाट्याने बिघडली आणि कारवाई हिंसक झाली. दरम्यान, या मोहिमेवर नागरिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मोठ्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करून छोट्या, हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांवर कारवाई केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक गरीब कुटुंबांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याने महिलांनी रडत-ओरडत निषेध नोंदविला. मात्र, प्रशासनाने त्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी कारवाई सुरूच ठेवली, अशी टीका होत आहे. विशेष म्हणजे, खडकपुरा परिसर यापूर्वीही संवेदनशील ठरला आहे. याच भागात महापालिकेच्या अधिकार्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या असून, प्रशासनाला याची पूर्ण कल्पना होती. तरीही आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मिल गेट आणि कला मंदिर परिसरातील कारवाई तुलनेने सुरळीत पार पडल्यामुळे पुढील मोहिमाही निर्विघ्न पार पडेल, असा महापालिकेचा अंदाज होता. मात्र खडकपुरातील घटनेने हा अंदाज पूर्णपणे फोल ठरविला. या पार्श्वभूमीवर भविष्यातील अतिक्रमण हटाव मोहिमांसाठी अधिक काटेकोर नियोजन, पोलीस बंदोबस्त आणि स्थानिकांशी संवाद या बाबींवर भर देण्याची गरज अधोरेखित होत आहे. अन्यथा अशा मोहिमा प्रशासनासाठीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

COMMENTS