Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

वंगभूमीत फुलले कमळ; ममतांचा गड उद्ध्वस्त! प. बंगाल, आसाममध्ये भाजपची सत्ता तर केरळमध्ये काँगे्रसने मारली मुसंडी; तामिळनाडूमध्ये टीव्हीके; पदुच्चेरीमध्ये एनडीएची सत्ता

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून, वंगभूमीत भाजपने तब्बल 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता दीदींना

सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री होणारनितीशकुमार सरकार बरखास्त ; राज्यपालांकडे दिला राजीनामा
बिहारमध्ये नव्या पर्वाची सुरुवात! भाजप नेते सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती…
पडद्याआडचे परिसीमन संसदेत पराभूत !
बंगाली अस्मितेवर अखेर भाजपचीच 'ममता' -

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून, वंगभूमीत भाजपने तब्बल 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ममता दीदींना धूळ चारत तब्बल 200 पेक्षा अधिक जागा जिंकत सत्ता मिळवली आहे. पश्‍चिम बंगाल, आसाम राज्यात भाजपने तर केरळमध्ये 10 वर्षांनंतर काँगे्रसने पुनरागमन करत सत्ता मिळवली. तामिळनाडूमध्ये डीएमकेचे साम्राज्य धुळीला मिळवत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सत्ता मिळवली आहे. तर छोट्याशा असणार्‍या पदुच्चेरी राज्यात एनडीएने प्रादेशिक पक्ष असलेल्या ऑल इंडिया एन.आर.काँग्रेससह सत्ता मिळवली आहे.
पश्‍चिम बंगालमध्ये भाजपने निर्विवाद यश मिळवले असून यामागे प्रचारापासून ते मतदानापर्यंत आखलेल्या नियोजनबद्ध डावपेचांमुळे ही निवडणूक चुरशीची ठरली. पक्षाची दीर्घकालीन रणनीती महत्त्वाची ठरल्याचे दिसते. अमित शाह यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांनी राज्यात तळ ठोकून प्रचाराची धुरा सांभाळली. तसेच शुभेंदु अधिकारी यांनी स्थानिक पातळीवर पक्षासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात निर्णायक भूमिका बजावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय नेतृत्वाच्या सक्रियतेमुळे पक्षाचा प्रभाव वाढला. भाजपाने राज्यात संघटनात्मक पातळीवर मोठी पुनर्रचना केली. स्थानिक नेतृत्व तयार करत ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये पक्षाची पकड मजबूत करण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांचे जाळे उभारून मतदारांशी थेट संपर्क साधण्यात यश मिळाले. तृणमूलकडून भाजपावर बाहेरील पक्ष असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र भाजपाने स्थानिक प्रश्‍नांवर लक्ष केंद्रित करत हा प्रचार निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मतदारांमधील संभ्रम कमी झाला आणि पक्षाला फायदा झाला. मतदारांच्या यादीनुसार कार्यकर्त्यांची नियुक्ती करून प्रत्येक मतदाराशी संपर्क साधण्याची रणनीती राबवण्यात आली. मतदानाच्या दिवशी मतदारांना केंद्रांपर्यंत आणण्यातही या यंत्रणेची महत्त्वाची भूमिका राहिली. महिला, शेतकरी आणि युवकांसाठी विविध योजनांची घोषणा करून मतदारांना आकर्षित करण्यात आले. विकासकामे आणि पायाभूत सुविधांवर दिलेला भरही निर्णायक ठरल्याचे दिसते.
तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता थलपती विजयचा मोठा प्रभाव आहे.विशेषतः युवकांमध्ये आणि शहरी भागात त्यांना मोठा पाठिंबा मिळाला. त्यांच्या सभांना उमटलेली गर्दी आणि उत्साह याचे रूपांतर मतांमध्ये झाल्याचे जाणवते. तब्बल 110 पेक्षा अधिक जागा जिंकत सत्ता स्थापन करण्याचा दावा विजय यांनी केला आहे. या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मतदारांचा कल झपाट्याने बदलल्याचे निरीक्षण आहे. पारंपरिक पक्षांना पाठिंबा देणार्‍या मतदारांनीही पर्याय म्हणून विजय यांच्या पक्षाकडे वळल्याचे चित्र दिसले. एकूणच, तामिळनाडूमध्ये नव्या राजकीय पर्यायाचा उदय होत असून राज्याच्या सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.


तामिळनाडूच्या राजकारणात थलपती विजयचा उदय

दक्षिणेकडील तामिळनाडूमध्ये अभिनेते थलपती विजय यांनी स्थापन केलेल्या टीव्हीके या नव्या पक्षाने अल्पावधीतच प्रभाव निर्माण केला आहे. त्यांच्या सभांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद मतदानातही दिसून येत असून या पक्षाने तामिळनाडू विधानसभेमध्ये असणार्‍या 234 जागांपैकी 110 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवला. तामिळनाडूच्या राजकारणात थलपती विजयचा उदय असून, आगामी राजकारणावर त्याची पुढील कारकीर्द अवलंबून असणार आहे.

केरळमध्ये काँगे्रसने खेचून आणली सत्ता
केरळमध्ये काँग्रेस-नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट अर्थात युडीएफने सर्वाधिक जागा मिळवत सत्तांतर केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही केरळमधील जनतेचे आभार मानत, राज्यात आता विकास आणि संधींना चालना देणारे सरकार मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. या निवडणुकीत डाव्या आघाडीला मोठा फटका बसला असून, काही पारंपरिक बालेकिल्लेही ढासळले आहेत. भाजपने कोल्लम जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघात विजय मिळवत नवा इतिहास रचला आहे. एकूणच, केरळमधील या निवडणुकीने राज्याच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला असून, सत्तेची सूत्रे आता नव्या नेतृत्वाकडे जाण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. तरीही, पिनरायी विजयन यांचा वैयक्तिक विजय हा या निकालातील एक महत्त्वाचा अपवाद ठरला आहे.

आसाममध्ये पुन्हा हिंमता पर्व
आसाम राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपसह एनडीएने स्पष्ट आघाडी घेत सत्ता कायम ठेवली आहे. हिंमता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत एनडीएच्या सरकारने तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आसामच्या 126 जागांपैकी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी 100 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. 2016 मध्ये भाजपने आसामध्ये पहिल्यांदा सरकार स्थापन केले. येथे भाजपने पहिल्यांदा सर्बानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्री केले. यानंतर 2021 मध्ये हेमंत सरमा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. तेव्हापासून राज्यात भाजपाचे वारे जोरदार वारे वाहू लागले. यंदाही भाजपने त्यांच्याच नेतृत्त्वात निवडणूक लढवली. सध्याच्या घडीला भाजप 126 पैकी 100 पेक्षा अधिक जागांवर पुढे आहे.

पुदुच्चेरीत एनडीएने राखला आपला गड
पुदुच्चेरी विधानसभेत अवघ्या 30 जागा असून या निवडणुकीत भाजप आणि ऑल इंडिया एन.आर. काँगे्रस यांची आघाडी असून या एनडीने 14 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत विजयाच्या दिशेने वाटचाल केली होती. ऑल इंडिया एन.आर. काँगे्रसने 12 तर डीएमकेने 4 आणि भाजपने 4 जागांवर आघाडीवर होता.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा पराभव
तामिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन कोलाथूर मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत. टीव्हीकेचे बी. एस. बाबू यांनी 8,000 हून अधिक मतांनी त्यांचा पराभव केला. बाबू पूर्वी डीएमकेमध्ये होते आणि फेब्रुवारी 2026 मध्ये ते विजय यांच्या पक्षात सामील झाले होते.

COMMENTS