केरळमध्ये गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित यूडीएफने बहुमताचा टप


केरळमध्ये गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांना मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित यूडीएफने बहुमताचा टप्पा ओलांडून सत्ता स्थापनेच्या दिशेने झेप घेतली आहे. मात्र, या निकालात सर्वात मोठी चर्चा रंगली आहे ती म्हणजे भाजपच्या ऐतिहासिक विजयाची!
डाव्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या चथन्नूर विधानसभा मतदारसंघात भाजपने (BJP) आपले पहिले खाते उघडले आहे. भाजपचे उमेदवार बीबी गोपकुमार यांनी डाव्या पक्षांचे उमेदवार अॅड. आर. राजेंद्रन यांचा ४,३९८ मतांनी पराभव करत इतिहास रचला. गोपकुमार यांना ५१,९२३ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी राजेंद्रन यांना ४७,५२५ मतांवर समाधान मानावे लागले. केवळ चथन्नूरच नाही, तर भाजप इतर दोन जागांवरही आघाडीवर आहे. नेमम मतदारसंघातून राजीव चंद्रशेखर आणि कझकोट्टम मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. सायंकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र दिसत आहे.
दुसरीकडे, केरळमध्ये सत्तांतर अटळ असल्याचे पाहून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी निकालापूर्वीच आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ‘मुख्यमंत्री’ पदाचा उल्लेख हटवला होता. काँग्रेसप्रणित यूडीएफने १०० हून अधिक जागांवर आघाडी घेत डाव्यांच्या एलडीएफला ३० ते ३५ जागांवर रोखले आहे.
२०२१ मध्ये ऐतिहासिकरीत्या सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवणाऱ्या एलडीएफचा यावेळी पूर्णपणे पराभव झाला असून केरळमध्ये पुन्हा एकदा पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची परंपरा कायम राहिली आहे. केरळच्या या नव्या राजकीय समीकरणावर तुमची प्रतिक्रिया काय आहे, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

COMMENTS