केज : केज तालुक्यातील पिंपळगाव येथील 14 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. पोहोत असताना कमरेला बांधलेले थर्माकोल तुटल्याने ही

केज : केज तालुक्यातील पिंपळगाव येथील 14 वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. पोहोत असताना कमरेला बांधलेले थर्माकोल तुटल्याने ही दुर्दैवी घटना घडली असून सदर घटनेमुळे पिंपळगाव या गावावर शोककळा पसरली आहे.
दिनांक 30 एप्रिल 2026 गुरुवार रोजी केज तालुक्यातील पिंपळगाव (गव्हाण) येथील विराज विशाल शिनगारे वय 14 वर्षे हा मुलगा त्याच्या मित्रा सोबत विहिरीवर पोहायला शिकण्यासाठी सांगवी शिवरात गेला होता. परंतु विराजला पोहायला येत नसल्यामुळे त्याच्या कमरेला थर्माकोल बांधले होते. पोहत असताना विराज याच्या कमरेला बांधलेले थर्माकोल तुटल्याने विहिरीच्या पाण्यात बुडून विराजचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. सदर घटना ही दुपारी 3-00 वाजण्याच्या दरम्यान घडली असून सायं.6-30 वाजण्याच्या सुमारास मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात यश आले. विराज विशाल शिनगारे हा गुरुवारी दुपारी त्याच्या मित्रा सोबत पोहायला शिकण्यासाठी सांगवी शिवारातील बाळासाहेब माणिक केदार यांच्या शेतातील विहिरीवर गेला होता कमरेला थर्माकोल बांधून विहिरीत उडी मारली मात्र थर्माकोल तुटल्याने 35 फुटापर्यंत पाणी पातळी असल्याने विराज याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक फौजदार पी.टी. चव्हाण, चालक सहाय्यक फौजदार शंभू दराडे व होमगार्ड सुरज भैरट यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बोराट्याच्या काठाडे टाकून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र मृतदेह हाती लागत नव्हता शेवटी पैठण येथील बचाव पथकाशी संपर्क साधला असता सदरील पथक हे धाराशिव कडे जात असताना त्यांना सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर सदर पथक मांजरसुंबा कडून घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळच्या वेळी मृतदेह बाहेर काढण्यास यश आले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळच्या वेळी नेहण्यात आला. उपजिल्हा रुग्णालय केज येथे मृतदेह ठेवण्यासाठी तांत्रिक अडचण असल्याकारणाने सदर मृतदेह हा अंबाजोगाई येथे पाठविण्यात आला आहे. याचा पुढील तपास केज पोलीस करत आहेत.

COMMENTS