नवी दिल्ली : पाकिस्तानकडून होणार्या दहशतवादी कारवायांना ठाम प्रत्युत्तर देण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज असून, गरज पडल्यास दीर्घकालीन लढ्यासही देश

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून होणार्या दहशतवादी कारवायांना ठाम प्रत्युत्तर देण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज असून, गरज पडल्यास दीर्घकालीन लढ्यासही देश तयार आहे, असा ठाम इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. गुरूवारी राजधानीत झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा विषयक परिषदेत ते बोलत होते. संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले की ‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई भारताने आपल्या अटींवर आणि स्वेच्छेने थांबवली होती. या निर्णयामागे कोणतीही कमजोरी नव्हती, तर तो पूर्णपणे धोरणात्मक विचार करून घेतला गेला होता. आवश्यकतेनुसार पुढील कारवाई करण्याची क्षमता देशाकडे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
पाकिस्तानवर टीका करताना त्यांनी त्या देशाला आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र असल्याचा आरोप केला. दहशतवादाचा पूर्ण नायनाट करण्यासाठी केवळ लष्करी कारवाई पुरेशी नसून त्याच्या वैचारिक आणि राजकीय मुळांवरही प्रहार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
संरक्षण मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत सांगितले की सरकार दहशतवादाबाबत शून्य सहनशीलतेचे धोरण राबवत आहे. कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद सहन केला जाणार नाही, हा देशाचा स्पष्ट संदेश असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की ही कारवाई पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू करण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान भारतीय सैन्याने केवळ दहशतवादी कारवाया चालवल्या जाणार्या ठिकाणांनाच लक्ष्य केले. या कारवाईत अनेक महत्त्वाचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि मोठ्या संख्येने दहशतवादी निष्प्रभ करण्यात आले. पुढे त्यांनी सांगितले की भारताच्या लष्करी क्षमतेत लक्षणीय वाढ झाली असून, शांततेच्या काळात तसेच युद्धजन्य परिस्थितीतही आवश्यक संसाधने वेगाने उभारण्याची ताकद देशाकडे आहे. अणुहल्ल्याच्या धमक्यांनाही भारताने भीक घातली नाही आणि कोणत्याही दबावाखाली झुकणार नाही, असा ठाम संदेश त्यांनी दिला. दहशतवादाच्या स्वरूपावर भाष्य करताना संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की हा केवळ सुरक्षेचा प्रश्न नसून त्याचे कार्यकारी, वैचारिक आणि राजकीय असे तीन महत्त्वाचे पैलू आहेत. या तिन्ही स्तरांवर एकत्रित कारवाई केल्याशिवाय दहशतवादाचे संपूर्ण उच्चाटन शक्य नाही.
दरम्यान, पहलगाम येथील हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मे महिन्यात ही कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवस दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. अखेरीस परस्पर सहमतीने संघर्ष थांबवण्यात आला, मात्र भारताने आपली भूमिका ठाम ठेवत भविष्यातील कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे.

COMMENTS