एका गाडीतून गोवंशाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून गोरक्षक आणि एका विशिष्ट समाजाच्या तरुणांतील वादावादीनंतर दोन गटात राडा झाल्यामुळे रविवारी रा

एका गाडीतून गोवंशाची वाहतूक होत असल्याच्या संशयावरून गोरक्षक आणि एका विशिष्ट समाजाच्या तरुणांतील वादावादीनंतर दोन गटात राडा झाल्यामुळे रविवारी रात्री तामसा शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. सुमारे दोन तास चाललेल्या या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर पोलिसांनी कायदेशीर भूमिका घेताच तक्रारदाराने माघार घेतली आणि मोठा अनर्थ टळला. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता. उल्लेखनीय म्हणजे मागील काही दिवसांपासून शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे का? याबाबत स्थानिक पोलिसांनी आत्मचिंतन करावे असे जाणकारांचे मत आहे.
तामसा शहर व परिसरातून गोवंशाची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होते. दि. 22 रोजी तामसा पोलीस ठाण्यात जमादार श्यामसुंदर नागरगोजे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल होऊन चार लाखाच्या वाहनासह सहा लाखाचे तीन गोवंश ताब्यात घेण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच रविवारी सायंकाळी एका वाहनातून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याचा संशय गोरक्षकांना आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण करुन संशयित गाडी अडवून तपासणी केली. मात्र, तपासणीअंती गाडीत कोणत्याही प्रकारचा गोवंश मिळून आला नसल्याने ती सोडण्यात आली, परंतु यादरम्यान गोरक्षक आणि दुसर्या गटाच्या तरुणांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन राडा झाला. पोलिसांनी मध्यस्थी करुन जाग्यावरच वाद मिटवल्यानंतर एका विशिष्ट समाजाचे तरुण मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. त्यामुळे पोलीस ठाणे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी भोकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय हक्के यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून नांदेड येथील अतिरिक्त पोलीस फोर्ससह हदगाव, हिमायतनगर, मनाठा आणि भोकर येथून मोठी पोलीस कुमक दाखल झाली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कायदेशीर भूमिका घेऊन दोन्ही बाजूंच्या प्रमुख व्यक्तींशी संवाद साधून शांततेचे आवाहन केले. अखेर, फिर्यादीने तक्रार देण्याचे टाळल्यामुळे निर्माण झालेला तणाव निवळला. खबरदारी म्हणून शहराच्या मुख्य चौकांमध्ये दोन तास पोलिसांचा पहारा होता. सध्या तामसा शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहादेव खेडकर यांनी केले

COMMENTS