बीड : मुंबई येथे 19 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय लाइव्ह मॅथ ग्रँड मास्टर ओलंपियाड स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्यातील मयंक शैल

बीड : मुंबई येथे 19 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय लाइव्ह मॅथ ग्रँड मास्टर ओलंपियाड स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्यातील मयंक शैलेश चौधरी याने आपल्या असामान्य गणिती कौशल्याच्या जोरावर जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट मॅथ विजेता म्हणून मान मिळवला आहे. या स्पर्धेमध्ये जगभरातील अनेक देशांतील प्रतिभावान विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासह जपान, संयुक्त अरब अमिरात, नेपाळ, श्रीलंका, अमेरिका, रशिया, जर्मनी (बर्लिन), रोमानिया, हाँगकाँग आणि मलेशिया यांसारख्या विविध देशांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत तीव्र स्पर्धा आणि मर्यादित वेळेत गणिती समस्या सोडवण्याच्या या स्पर्धेत मयंकने केवळ 12 मिनिटांत सर्व प्रश्न अचूक सोडवत सर्वोच्च गुण प्राप्त करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मयंकच्या या यशामागे अबॅकस आणि वैदिक गणित पद्धतीचा सातत्यपूर्ण सराव तसेच त्याच्या शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन हे महत्त्वाचे ठरले. मागील चार ते पाच महिन्यांपासून त्याने नियमित सराव करून गणितातील गती, अचूकता आणि आत्मविश्वास यामध्ये उल्लेखनीय सुधारणा केली होती. त्याच्या यशामध्ये पालकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन आणि पाठबळ देखील अत्यंत महत्त्वाचे ठरले. मयंकच्या पालकांनी सांगितले की, त्याच्या क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास होता, परंतु जागतिक स्तरावरील स्पर्धेत इतक्या देशांतील विद्यार्थ्यांमध्ये तो यशस्वी होईल, याचा आम्हाला अभिमान आहे. या स्पर्धेचे आयोजन लाइव्ह मॅथ ओलंपियाड असोसिएशन (दुबई व इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाबद्दलची भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढतो, तसेच स्मरणशक्ती आणि विश्लेषण क्षमता विकसित होते, असे अबॅकस मार्गदर्शक डॉ. एस. ए. घोडके यांनी सांगितले. डॉ. घोडके यांनी मयंकच्या यशाचे विशेष कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अबॅकस प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना गणित अधिक सोप्या पद्धतीने समजते आणि गुंतागुंतीच्या समस्या कमी वेळेत सोडवण्याची क्षमता विकसित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. या उल्लेखनीय कामगिरीनंतर मयंक शैलेश चौधरी याचे नाव वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसाठी नोंदणी प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले आहे. ही त्याच्या शैक्षणिक प्रवासातील एक मोठी ऐतिहासिक पायरी मानली जात आहे. मयंकच्या या यशामुळे बीड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून शैक्षणिक क्षेत्र, स्थानिक नागरिक, शिक्षकवर्ग तसेच विविध सामाजिक स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत. या यशामुळे मयंकने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.

COMMENTS