माजलगाव : बहुजन क्रांती मोर्चा व लसाकम यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे आंबेडकरी मातंग समाज परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 26

माजलगाव : बहुजन क्रांती मोर्चा व लसाकम यांच्या संयुक्त विद्यमाने बीड येथे आंबेडकरी मातंग समाज परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 26 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी नगर येथील अस्मिता फंक्शन हॉलमध्ये ही परिषद पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या परिषदेकडे बीड जिल्ह्यातील आंबेडकरी मातंग समाजाचे विशेष लक्ष लागले असून मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परिषदेच्या माध्यमातून फुले, शाहू, आंबेडकर यांच्या चळवळीतील मातंग समाजाचे ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित करण्यात येणार आहे. तसेच सध्याची सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थिती, समाजासमोरील विविध प्रश्न आणि आगामी आव्हाने यावर सखोल विचारमंथन होणार आहे. बदलत्या सामाजिक-राजकीय वातावरणात मातंग समाजाची भूमिका काय असावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून समाजातील वैचारिक प्रवाहांचाही आढावा घेतला जाणार आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणीच्या अधिष्ठानावर समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न या परिषदेतून केला जाणार आहे. युवा पिढीने शिक्षण, संघटन व संघर्ष या तत्त्वांवर पुढे येत नेतृत्व घ्यावे, यासाठीही प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या परिषदेस आठवले गटाचे राज्य युवक अध्यक्ष पप्पूजी कागदे, डीपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैया चांदणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लहुजी क्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विकास पाथरीकर असणार असून डॉ. मिलिंद आवाड यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. परिषदेच्या माध्यमातून समाजातील ऐक्य बळकट करणे, सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमानासाठी ठोस भूमिका निश्चित करणे, तसेच कार्यकर्ते, युवक व मान्यवर यांच्यात संवाद वाढवून संघटन मजबूत करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. या परिषदेस बीड जिल्ह्यातील आंबेडकरी मातंग समाजातील सर्व नागरिक, कार्यकर्ते व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बाबुराव गालफाडे, कल्याण ताकतोडे, प्रताप मोरे यांच्यासह आयोजकांनी केले आहे.

COMMENTS