Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या ‘रामराज्यात’ तरोडा, सांगवी अवैध धंदे व विजेचा लपंडाव यामुळे बेजार;  स्वतःच्याच मंडळ अध्यक्षांचा सरकारला घरचा आहेर

नांदेड : राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपकडून सुशासन, विकास आणि कायदा-सुव्यवस्थेचे दावे सातत्याने केले जात असताना, नांदेड शहरातील तरोडा ,

मुंबईत ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; टिटवाळ्यात ६ कोटींच्या अमली गोळ्या जप्त, डान्सबारमधील तरुणीला बेड्या
सिरसदेवी येथे एलसीबीचा छापा; 8 किलो गांजासह एकाला अटक
महाराष्ट्राला ड्रग्जचा विळखा!

नांदेड : राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपकडून सुशासन, विकास आणि कायदा-सुव्यवस्थेचे दावे सातत्याने केले जात असताना, नांदेड शहरातील तरोडा , सांगवी परिसरातील वास्तवाने या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विशेष म्हणजे विरोधकांनी नव्हे, तर खुद्द भाजपच्या तरोडा सांगवी मंडळाचे अध्यक्ष निलेश कुंटूरकर यांनीच आपल्या सरकारच्या कारभारावर बोट ठेवत पालकमंत्र्यांकडे निवेदन सादर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
तरोडा, सांगवी परिसरात गुन्हेगारी वाढत असून अवैध दारू विक्री, गांजा, अमली पदार्थांची साखळी आणि मटक्याचे अड्डे खुलेआम सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ढाब्यांवर सर्रास दारू विक्री होत असल्याने तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे ढकलली जात असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. सर्वात गंभीर बाब म्हणजे, या प्रकारांकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचा सूर सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनीच लावला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? असा सवाल उपस्थित होत आहे. परिसरातील दत्त मंदिर, मारोती मंदिर तसेच शैक्षणिक संस्थांच्या जवळ मद्यविक्री केंद्रे सुरू असल्याने महिलांमध्ये व पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. संस्कृती, परंपरा आणि सामाजिक मूल्यांची भाषा करणार्‍या पक्षाच्या कारकिर्दीतच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने स्थानिकांमध्ये संताप वाढत आहे. दुसरीकडे वीज आणि पाणी समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. कडक उन्हाळ्यात तासनतास वीजपुरवठा खंडित होत असून, पाणीपुरवठ्याच्या वेळेलाच वीज जाण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महावितरण आणि महानगरपालिका यांच्यातील समन्वयाअभावी नागरिकांना पाणी भरण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. वृद्ध, महिला, लहान मुले आणि रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे. अवैध वाळू वाहतूक, वाढते अपघात, असुरक्षितता आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे तरोडा सांगवी परिसरातील जनतेत तीव्र असंतोष आहे. स्वतःच्या पक्षाच्या पालकमंत्र्यांकडेच आंदोलनाचा इशारा देत निवेदन देण्याची वेळ भाजप मंडळाध्यक्षांवर येणे, हे सरकारच्या स्थानिक प्रशासनावरील नियंत्रणाबाबत गंभीर संकेत मानले जात आहेत. तरोडा सांगवी भाजप मंडळाध्यक्षांनी राज्याच्या गृह विभागासह महावितरण व्यवस्थेची केलेली ही उघडीपणे पोलखोल म्हणजे पक्षालाच दिलेला घरचा आहेर मानला जात असून, यावर सरकार काय भूमिका घेते याकडे आता संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.  पालकमंत्री स्वतः तीन-चार महिन्यातून एकदा नांदेडला दर्शन देतात दोन-चार सरकारी कार्यालयाच्या बैठका घेतात व ठराविक नेत्यांच्या बरोबर विश्रामगृहात वार्तालाप करतात. एवढाच पालकमंत्र्याचा कार्यक्रम असल्यामुळे चार-दोन नेत्यांची चांदी होत असली तरी सामान्य कार्यकर्त्यांना मात्र कोणी वाली उरला नाही. त्यामुळे आता थेट पालकमंत्र्याकडेच आपल्या मंडळातील गैरसोयी व अवैध धंदे याबाबत भाजपाच्या मंडळाध्यक्षांना तक्रार करावी लागत आहे.

COMMENTS