Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुम्ही शाळेत प्रवेश घ्या; पाणी-घरपट्टी आम्ही भरतो !संक्रापूर शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग

देवळाली प्रवरा : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यभर विविध उपक्रम राबवले

माका येथे नारळी सप्ताहाची उत्साहात सांगता
नळ पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवा; पालकमंत्री विखेंचे निर्देश, नियमित वेतन व सुविधा देण्याच्या सूचना ; संप मागे
सावता महाराज मंदिर परिसरात गुणवंतांचा गौरव

देवळाली प्रवरा : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यभर विविध उपक्रम राबवले जात असताना, राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. शाळेच्या एका माजी विद्यार्थ्याने घेतलेला आगळावेगळा निर्णय सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
 पुण्यातील उद्योजक संदीप गेणुदास चव्हाण यांनी आपल्या मातृशाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची वर्षभराची घरपट्टी आणि पाणीपट्टी स्वतः भरण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 अहिल्यानगर जिल्हा परिषद प्रशासनाने माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळांचा विकास करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या संकल्पनेला प्रतिसाद देत संदीप चव्हाण यांनी शाळेची सद्यस्थिती पाहिली आणि ‘क्रांतिज्योती विद्यालय’ या चित्रपटातून प्रेरणा घेत पुढाकार घेतला. “गोरगरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि जिल्हा परिषद शाळांवरचा विश्वास वाढावा,” या उद्देशातून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
शाळा होणार अधिक आधुनिक केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता शाळेच्या सर्वांगीण विकासाचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. शालेय परिसरात परसबाग विकसित करण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी अत्याधुनिक ‘सायन्स लॅब’ उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष व वैज्ञानिक अधिकारी राहुल खेमनर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे. मुख्याध्यापक किशोर पवार, मनीषा माने-पवार, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभत आहे.
कोट
“ग्रामीण भागातील पालकांचा जिल्हा परिषद शाळेवरील विश्वास वाढविण्यासाठी आणि खासगी शाळांच्या स्पर्धेत आपली शाळा उजवी ठरवण्यासाठी माजी विद्यार्थी संघातर्फे विविध उपक्रम राबवित आहे. हे उपक्रम प्रभावी ठरतील. शाळेच्या प्रगतीसाठी योगदान देण्यात आनंद आहे.”
– राहुल खेमनर, वैज्ञानिक अधिकारी तथा अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ
 
“शाळेची दुरवस्था पाहून वेदना झाल्या.शाळेच्या इमारतीचे वॉटरप्रूफिंग करून छताची गळती थांबवली. रंगरंगोटी करून ‘बोलक्या भिंती’ साकारत आहोत. पुढे पेव्हिंग ब्लॉक, प्रवेशद्वार दुरुस्ती अशी कामे करणार आहे. तसेच, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी भरण्याचा निर्णय घेतला आहे.”
– संदीप चव्हाण, उद्योजक (पुणे) व माजी विद्यार्थी

COMMENTS